शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी -अरुण बलसाने

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी -अरुण बलसाने

  • भंडारा तालुक्यातील खराडी येथे सोयाबीनची पाहणी

भंडारा,दि.04: सोयाबीनचे पीक चांगले आले होते. चांगले उत्पादन हाती येणार मात्र पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी खचून न जाता येणाऱ्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागावे. यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा बियाण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी व कृषी विभागाच्या प्रमाणित बियाणे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी केले.
  भंडारा तालुक्यातील खराडी, खरबी येथे सोयाबीन पिकाची झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांशी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भंडाराचे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ कृषी अधिकारी विजय हुमणे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील रामटेके, पर्यवेक्षक माया बागडे, खराडीचे माजी सरपंच संजय दिवसे, ज्ञानेश्वर हिवसे यांच्यासह गावातील अन्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा प्रभारी अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात हरभरा बियाणे वाटपाचे नियोजन कृषी विभागाने केले असल्याचे सांगितले. मात्र यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे मार्गदर्शन करून ई-पीक पाहणी ॲपमध्ये पिक पेरा नोंदणीचे आवाहन केले.
  भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे प्रमाणित बियाणे वाटपाच्या योजनेतून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने पीक पेरणीचे नियोजन करावे यासाठी कृषी विभागातर्फे गावात प्रात्यक्षिक दाखविण्याचे आश्वासन दिले.  शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सिंचन योजना तसेच कृषी यांत्रिकीकरण महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून विविध योजनांचा एकत्रित लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शंकांचे निरसन केले.  शेतकरी योजनांचे महाडीबीटी पार्टल सुरू असून विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.
सन 2021-2022 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळित धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा साधनांसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने महाडीबीटीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी कृषी सहायकांशी संपर्क करून नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार करण्यात येणार आहे.
बियाणे वितरण असे होणार…

वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रुपये 25 प्रति किलो प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी स्थानिक पातळीवर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी केले आहे.