स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सामाजिक न्याय भवन येथे “सांस्कृतिक व विद्यार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रमांचे आयोजन”

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सामाजिक न्याय भवन येथे “सांस्कृतिक व विद्यार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रमांचे आयोजन”

भंडारा दि. 19 : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली त्या अनुषंगाने संपूर्ण भारत भर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय भवन येथे 12 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहातील व निवासी शाळेतील तसेच स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व लोककला मंचद्वारे सहभाग घेवून देशभक्तीपर विविध प्रकारचे सामूहिक नृत्य, एकल नृत्य व गीत गायन केले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या वतीने लेझीम द्वारे कार्यक्रम स्थळी आणण्यात आले व औक्षवण करून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनाप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून खासदार सुनील मेंढे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, उपायुक्त आर. डी. आत्राम, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बोरकर, उ.मु.का.अ. श्री. पानझडे, सहाय्यक आयुक्त सुकेशीनी तेलगोटे, संशोधन अधिकारी सचिन मडावी हे उपस्थित होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा‍धिकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागावर जबाबदारी सोपविली. तीच संधी समजून आपण त्याचं सोनं करुया, सामाजिक न्याय विभागाव्दारे फक्त मागासवर्गीयांच्याच योजना राबविल्या जातात असा समाजामध्ये असलेला गैरसमज या माध्यमातून दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करु, सामाजिक न्याय विभाग हे तळागाळातील सामान्यातील सामान्य नागरीकांकरीता काम करीत आहे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन आम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार माणून सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी आपले प्रास्ताविकेतील मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे योजिले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरीता ज्या क्रांतिवीरांनी देशासाठी बलिदान दिले त्यापैकी फक्त मोजक्याच स्वातंत्र्य सैनिकांची आपण आठवण काढतो. पण असे आणखी बरेच काही स्वातंत्र्य सेनानी होवून गेलेत त्यांचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे त्यांची आपण आठवण काढत नाही. त्यामुळे त्या स्वातंत्र्य सैनिकांची सुध्दा आजच्या प्रसंगी आठवण घ्यावी व त्यांची नांवे समोर यावी यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत खासदार सुनील मेंढे, यांनी आपले उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमीत्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे आज सामाजिक न्याय विभागाचे सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची मनोमन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. 15 ऑगष्ट, 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्या दिवसाची व स्वातंत्र्याकरीता सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याची आठवण करुन प्रत्येक भारतीयांनी मनातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त कराव्यात. असे मत आमदार महोदयांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता शुभेच्छा देतांना सांगीतले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरीता ज्या भारत मातेच्या पुत्रांनी बलिदान दिलेत त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी ही आपली असून आपण पुढे येवून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी असे मत व्यक्त केले.

जि.प. अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतांना देशाच्या एकात्मतेची भावना निर्माण करणे गरजेचे आहे, त्यांनी शिक्षणात प्रगती करुन देशभक्ती जागृत ठेवून देशसेवा करावी असे मनोगत व्यक्त केले.