जिल्हाधिका-यांच्या हस्ते विभाजन विभीषिका प्रदर्शनीचे उद्घाटन

जिल्हाधिका-यांच्या हस्ते विभाजन विभीषिका प्रदर्शनीचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट : देशाला सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यापूर्वी फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. अनेकांना प्राण गमवावे लागले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेले दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिका परिसरात लावण्यात आलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे सर्वत्र उत्साह आहे. जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी या देशाची फाळणी झाली. त्यावेळी अनेकांनी हालअपेष्टा सहन केल्या. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विभाजन विभीषिका छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी तर आभार सुशील सहारे यांनी मानले. यावेळी लोकजागृती संस्था चंद्रपूर या ग्रुपने देशभक्ती या विषयावर आधारीत कलापथक सादर करून वंदे मातरम, हर घर तिरंगा…घर घर तिरंगा अशा घोषणांनी भर पावसात उत्साह निर्माण केला.