कारागृहातील कैद्यांकरीता प्रबोधनात्मक सांस्कृतिक व समुपदेशनात्मक कार्यक्रम

कारागृहातील कैद्यांकरीता प्रबोधनात्मक सांस्कृतिक व समुपदेशनात्मक कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट : संपूर्ण देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत स्वराज्य महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर, थोर संत, ज्येष्ठ साहित्यिक व कवी, थोर महापुरुष यांच्या जीवन कार्यावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांना स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्व, प्रबोधन व समुपदेशन करणारा ‘जीवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कारागृह अधिक्षक वैभव आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी रवींद्र जगताप, विठ्ठल पवार, महेशकुमार माळी, तसेच औरंगाबाद येथील अनिल दहेगावकर, मनोज आमरे उपस्थित होते.

कैद्यांकरीता आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रच्या लोककलेसोबतच, कैद्यांचे प्रबोधन, योगाचे महत्व, देशभक्ती भावना जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्याचा सांस्कृतिक विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या कैद्यांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी देण्यात आली.

यावेळी देशभक्तिपर गीत संच प्रमुख प्रदीप यमनुरवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. देशभक्तीपर गीत व खास करून शाहिरी पोवाड्यांनी बंदीवासी मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी तर संचालन सुशील सहारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.