विविध घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

विविध घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

          भंडारा,दि.25 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पार्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करतांना संबंधीत कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

          बियाणे वितरण कार्यक्रमाअंतर्गत हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रुपये प्रति किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रुपये प्रति किलो, रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रति किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रति किलो याप्रमाणे किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे.

         अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ असून अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेलवर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.