पूर येवून गेल्यानंतर घ्यावयाची काळजी

पूर येवून गेल्यानंतर घ्यावयाची काळजी

गावात पूर येवून गेल्यानंतर वैयक्तिक स्तरावर काळजी घेणे गरजेचे आहे, यात – 1. पिण्याचे पाणी, 2. योग्य आहार, 3. घराची तपासणी, 4. परिसर स्वच्छता, 5.लाईटबाबत आवश्यक दुरूस्ती 6.जनावरांची काळजी.

पुरस्थिती म्हटलं की सर्वांच्या अंगावर काटा उभा राहतो. निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. आपण पावसाळ्यात आवश्यक काळजी अगोदरच घेतल्यास अतिवृष्टी अथवा पूर आल्यावर होणारे नुकासन नेहमीच टाळू शकतो. असो, पण आता जर गावात पूर येवून गेला असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट तपासावीच लागेल. यात कपड्यांपासून ते अगदी घराच्या भिंती, लाईट जोडणी, स्वच्छता अशा बाबी कराव्याच लागतील. प्रशासन सार्वजनिक स्तरावर उपाययोजना राबवित राहील, मात्र आपणाला आपल्या स्तरावर काही उपाययोजना या कराव्याच लागतात. याबाबत आपण घ्यावयाची काळजी सविस्तर पणे पाहू –

1. पिण्याचे पाणी

पूर येतो म्हणजे नदी नाला आपले नेहमीचे पाण्याचे पात्र सोडुन बाहेरून अगदी भरून वाहत असतात. यावेळी नदी नाला आपल्या काठावरील सर्व घाण, कचरा, मलमुत्र, मेलेली जनावरे आपल्याबरोबर वाहून नेहतो. मग हीच घाण पुरात गावागावातील परिसरात पसरत असते. यातून सर्व पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होतात. पिण्याचे पाण्याचे स्त्रोत प्रत्येक पावसाळयात अशुद्ध होण्याची शक्यता जास्त असते. पुराचे पाणी विहरीत, हातपंपात गेल्यावर ते ग्रामपंचायतीने शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गावातील सर्व पाणी पुरवठा योजनाही दुरूस्त करणे गरजेचे असते. यासाठी आपल्याच गावातील सरपंच व सदस्य यांनी पुढाकार घ्यावा. आता शुद्ध पाणी जरी घरापर्यंत आले तरी अशावेळी ते सहज पिणे टाळावे. तसेच आपण आपल्या पाण्याच्या स्त्रोतातून आणले पाणी तसेच न पीता त्याच्यावर पाणी शुद्धीकरणाची घरगुती प्रक्रिया करावी. यामध्ये पुढिल प्रक्रिया राबवून पाणी घरच्या घरीच निर्जंतुक किंवा शुद्ध करून प्यावे-

• चार पदरी फडक्याने पाणी व्यवस्थित गाळून घ्या व ते पाणी उकळवून थंड करून प्यावे.

• असल्यास पाण्यातून तुरटी फिरवून घ्या.

• क्लोरीन पावडरचा उपयोगही आपण 1000लि. पाण्यासाठी 5 ग्रॅम प्रमाणे करू शकतो.

• ग्रामपंचायतीने मदर सोल्यूशन दिले असल्यास ते वापरता येते.

• पिण्याच्या पाण्याच्या वापरातील सर्व भांडी स्वच्छ धुणे.

यापैकी सर्वांत चांगला पर्याय हा पाणी उकळून थंड करून पिणे हा आहे. परंतू आपला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत देखील निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबवून शुद्ध करणे गरजेचे.

2. योग्य आहार

पूर आल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. अशावेळी योग्य अन्न मिळणे कठिण असते. प्रशासन यावेळी आवश्यक मदत पाठवेल. मात्र अशा वेळी योग्य व वातावरणाला साजेसे साधे अन्न घेणे आवश्यक असते. ते अन्न चांगले शिजवून घ्यावे. अशुद्ध पाणी व चुकीचे अन्न यामुळे हागवण लागू शकते. त्यामुळे अशा वेळी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत लोकांची विशेष काळजी घ्यावी.

3. घराची तपासणी

पुरात आपले घर पाण्यात काही प्रमाणात किंवा बहुतांश गेले असल्यास त्यानंतर त्याची तपासणी सर्वात आधी करावी. कारण पाण्याने भिंती कमजोर होवू शकतात. मातीचे घर तर खुप धोकादायक राहते. त्यामुळे भिंतीला भेगा गेल्या असल्यास, घराजवळची जमीन खचली असल्यास त्या घरात जाणे टाळावे. ग्रामपंचायतीला कळवून पर्यायी निवारा शोधावा. घर चांगल्या स्थितीत असल्यास त्याची तपासणी करून स्वच्छता करून वापरावे.

4. परिसर स्वच्छता

पूर येवून गेल्यानंतर घरातील उंच भागावर घाण, कचरा व साप, इतर किटक असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी प्रथम साप, किटक यांची खातरजमा करावी. त्यानंतर स्वच्छता मोहिम हाती घ्यावी. साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते. साठलेले पाणी, डबके बुजवावे. पुराचे पाणी बाहेर काढून, घर चांगल्या पाण्याने धुवून घ्यावे. भिजलेले सामान सुकण्यासाठी बाहेर ठेवावे. घर रिकामे करून स्वच्छ केल्यास घरात काही विषारी प्राणी नाहीत याची खात्री करता येते. घराचा आतील भाग जेवढा महत्वाचा आहे तेवढीच स्वच्छता आजूबाजूला पण करून घ्यावी.

5. लाईटबाबत आवश्यक काळजी

गावाता पुराचे पाणी आल्यावर महावितरण कडून ती लाईन बंद केली जाते. पूर ओसरल्यानंतर पुन्हा लाईन सुरू केली जाते. मात्र अशावेळी घरातील लाईट एकदम सुरू करण्याऐवजी ती मीटर पासून बंद करून आवश्यक दुरूस्ती करावी. मीटर बंद करून सर्व वायर्स सुकल्याची खात्री करा. तुटलेल्या वायर व्यवस्थित जोडल्याची खात्री करा. लाईटचे बोर्ड भिजले असतील तर ते दुरूस्त करा. बल्ब्, टयूब यांची दुरूस्ती, स्वच्छता करा. सर्व खात्री पटल्यानंतरच लाईट मीटर पासून पुढे सुरू करा. कारण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शॉक लागण्याचे आपघात घडत असतात.

6. जनावरांची काळजी

आपल्या घरातील जनावरे ही उत्पन्नाचे मुख्य साधन असते. तसेच पुरानंतर आपणाला आहारात सर्वांत जलद मिळणारा घटक म्हणजे दुध होय. त्यामुळे पुरानंतर अशा जनावरांची काळजी महत्वाची ठरते. गावात आल्यानंतर त्यांना चाराही लगेच मिळणे शक्य नसते. यावेळी पुर नसलेल्या ठिकाणाहून त्यांना आवश्यक चारा गोळा करावा. किंवा चांगल्या ठिकाणी त्यांना चराईसाठी घेवून जावे. जनावरांनाही साथरोग पुरादरम्यान येवू शकतो. त्यामुळे त्यांची आवश्यक काळजी घ्यावी. पुशूसंवर्धन विभगाला कळवून गावात लसीकरण मोहिम हाती घेता येवू शकते.

पुरानंतर साथीचे आजार येण्याची दाट शक्यता असते

पूर हा दुषित पाणी असणारा घटक आहे. पाण्याचे स्त्रोत, नदी, नाले, दलदल, डबके येथील सर्वच पाणी पुरात अशुद्ध होते. पुराच्या पाण्यात मल-मुत्र, मेलेली जनावरे असे आजार पसरविणारे घटक असतात. तसेच दलदलीमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत राहते. यातून पुढिल आजार पसरण्याची दाट शक्यता असते.

• हागवण

• हिवताप

• कावीळ

• डेंगू

• चिकनगूनीया

• ताप

तेव्हा कौटुंबिक स्तरावर उचित काळजी घेवून आपण आपले आरोग्य सांभाळू शकतो. घरातील कोणालाही ताप, खोकला किंवा श्वसनास त्रास, हागवण यापैकी काही झाल्यास आरोग्य विभाग अथवा स्थानिक प्रशासनास माहिती द्यावी. यामुळे जर साथरोग असेल तर वेळेत प्रशासनाला उपाययोजना राबविता येतील.

(जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोली)