शेतकऱ्यांना बांधावर मिळणार आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

शेतकऱ्यांना बांधावर मिळणार आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

 अरुण बलसाने: कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त जागृती मोहीम

भंडारा, दि 22 : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरीप हंगामापूर्व कृषी संजीवनी मोहीम जिल्हाभरात 25जून ते 1 जुलै या कालावधित ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडाराचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी केले आहे.

कृषी संजीवनी सप्ताहात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यामध्ये 25 जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण, 26 जून रोजी पौष्टिक तृणधान्य दिवस, 27 जून रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जून रोजी खत बचत दिन, 29 ला प्रगतिशील शेतकरी संवाद दिवस 30 ला शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस, 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे.

मोहिमे संदर्भात अधिक माहितीसाठी गावस्तरावर शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी केले आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञांमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन, संरक्षित शेती, भाजीपाला व फूल लागवड, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेततळ्यातील मत्स्यपालन, रेशीम, मधुमक्षिकापालन खादी ग्राम उद्योग विभागांचे तंत्रज्ञान व योजनाची माहितीसह 1 जुलै रोजी कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता कृषी दिन साजरा करून होणार आहे. या सप्ताहादरम्यान कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या व्यतिरिक्त या कालावधीत ग्राम कृषी विकास समितीच्या बैठका घेऊन गावातील शेतीचे नियोजन कसे करावे याबाब तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती भंडाराचे जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी दिली आहे.

तंत्रज्ञान प्रसार व मूल्य साखळी बळकटीकरण

विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, कडधान्य पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश, वाण, बियाणे निवड, बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी, पौष्टिक तृणधान्यांची लागवड तंत्रज्ञान, पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व, पिक प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच शेत तिथे पौष्टिक तृणधान्य संकल्पना याबाबत मार्गदर्शन, महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण, महिलांकरिता कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण, पिक तंत्रज्ञान व महिलांना वापरता येतील असे शेतीतील यंत्रसामग्री संदर्भात माहिती, खत बचतीसह जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर पिकांची खतमात्रा बनवणे, सूक्ष्म मलद्रव्य महत्त्व, विद्राव्य खते व त्यांचा वापर, खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन, प्रगतीशील शेतकरी संवाद, जिल्ह्यातील रिसोर्स बँक मधील शेतकऱ्यांकडून त्यांनी अवलंबिलेल्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेटी सप्ताहात आयोजित केल्या जाणार आहेत.