तीनही राज्याच्या संवेदनशील सीमेवर पोहचत, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांचे वाढवले मनोबल

तीनही राज्याच्या संवेदनशील सीमेवर पोहचत, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांचे वाढवले मनोबल

 

गोंदिया,दि.२५ : विदर्भातील नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिस दलाचे मनोबल उंचावत राहणे नितांत गरजेचे आहे. पोलिसांना हेच पाठबळ देण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदियाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी थेट तीन राज्यांचा अत्यंत संवेदनशील परिसर गाठला. नक्षलवादी कारवायांचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील परिसर गाठणारे ना. श्री. मुनगंटीवार हे विदर्भातील अलीकडच्या काळातील पहिलेच मंत्री आहेत.

 

नक्षलवादी कारवायांनी विदर्भातील काही जिल्हे पोखरून काढले आहेत. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी यापूर्वीही काही मंत्र्यांनी पोलिसांना पाठबळ दिले. परंतु चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आता हे आव्हान राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनीही स्वीकारले आहे. यासंदर्भात त्यांनी एक पाऊल पुढे टाकत मुरुकडोह येथे भेट देत नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या जवानांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. मुरुकडोह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर आहे. नक्षलावादी कारवायांच्या दृष्टीने हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो.

 

ना. श्री. मुनगंटीवार यांनी आपुलकीने प्रत्येक जवानाशी संवाद साधला. त्यामुळे येथे तैनात असलेल्या केवळ महाराष्ट्र पोलिसांचेच नव्हे तर उर्वरित दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे मनोबलही अप्रत्यक्षपणे वाढले आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत येथे जनजागृती मेळावाही घेण्यात आला. यावेळी नक्षल्यांची भीती झुगारून तब्बल सुमारे ६०० ते ७०० नागरिकांनी जनजागृती मेळाव्याला उपस्थिती नोंदविली. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी नागरिकांशीही संवाद साधला. लोकशाही प्रवाहात राहत विकासाच्या मार्गाचे वाटेकरी व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

मुरुकडोहचा परिसर नक्षलवाद्यांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अर्थात एमएमसी झोन म्हणुन या भागाला ओळखले जाते. तीनही राज्यातील नक्षलवादी या भागात सक्रिय असतात. बालाघाट आणि राजनांदगाव परिसरात दिवसाआड नक्षल्यांचे हल्ले होत असतात. अशा परिस्थितीतही कोणतीही तमा न बाळगता मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार स्वत: एमएमसी झोनपर्यंत पोहचले. गोंदिया जिल्ह्यातील या दुर्गम भागात आतापर्यंत कोणत्याही मंत्र्याने प्रत्यक्ष भेट दिल्याचे ऐकिवात नाही. मात्र पालकमंत्री म्हणून ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्यांची कार्यशैली ईतरांपेक्षा ‘हटकेच’ आहे.