जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 10 लक्ष वृक्षलागवडीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 10 लक्ष वृक्षलागवडीचा आढावा

· कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

 

चंद्रपूर, दि. 17: जिल्ह्यात पुढील महिन्यात वटवृक्ष, कडूनिंब यासह इतर एकूण 10 लक्ष वृक्ष लागवड महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. सदर वृक्ष लागवडीसाठी वटपौर्णिमेपासून जनजागृती करण्यात यावी व पहिला पाऊस झाल्यानंतर साधारणत: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वृक्ष लागवड करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.

 

वृक्षलागवड मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज वीसकलमी सभागृहात घेतला. याप्रंसगी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, मनपा उपायुक्त अशोक गराटे,कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.आर.बहुरिया याप्रसंगी उपस्थित होते.

 

महानगरपालिका, वन विभाग, सामाजिक वनिकरण, जिल्हा परिषद, कृषी विभाग, नगरपालिका, ग्राम पंचायती व इतर विभागांनी नियोजनाप्रमाणे जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील रोपवाटीकेतून रोपे उपलब्ध करून वृक्ष लागवडीसाठी जागेची निवड करावी. महानगरपालिकेने खुली जागा व रस्त्याच्या कडेला ट्री-गार्डसह वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील विविध कंपन्यांना सामाजिक दायित्व अंतर्गत (सी.एस.आर.) प्रत्येकी एक लक्ष वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

 

आढावा बैठकीला विविध विभागाचे संबंधीत अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.