चला जाणूया नदीला मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

चला जाणूया नदीला मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा, दि. 6 : आपल्या संस्कृतीमध्ये नद्यांना महत्वाचे स्थान आहे. परंतु वेगवेगळ्या कारणामुळे नद्यांची शुध्दता धोक्यात आली आहे. नदीच्या उगम स्थानापासून काही अंतरावरच नदीची वाताहत होते. त्यामुळे नद्यांचे संगोपण करणे ही आता काळाची गरज बनली आहे. नदी पर्यावरणाचा महत्वाचा भाग असून नदीला जाणून घेणे, तिच्या इतर समस्यांचा अभ्यास करणे व त्यावर उपाय शोधून त्याची कायमस्वरूपी सोडवणूक करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे चला जाणूया नदीला या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

 

आज तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल येथे आयोजित जलपुजन व नदी संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक श्री. नागुलवार, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुहास कापगते, सुकळी नकुलचे सरपंच गिता आंबेडारे तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नदी समन्वयक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चला जाणूया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये स्वातंत्र्य सेनानी यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकूण नागरिकांना त्यांच्या कर्तृत्वाची माहिती पोहचविण्यात येत आहे. जलस्त्रोत वाढविण्याकरिता आपल्याला काय करता येईल हे नागरिकांनी चला जाणूया नदीला या अभियानामध्ये कळवावे, त्यानुसार आपल्याला चांगला आराखडा तयार करता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी म्हणाले की, पर्यावरण साखळीमध्ये नदी ही अत्यंत महत्वाची आहे. आता आपल्याला नदीला पुर्वस्थापीत करायचे आहे. त्या करिता गावातील नागरिकांनी पुढाकार घेवून चला जाणूया नदीला अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा व चुलबंद नदीचा समावेश चला जाणूया नदीला या अभियानात करण्यात आला आहे. नदी काठावरील गावांमध्ये जाऊन नदीच्या समस्या लोक सहभागातून जाणून घेण्याकरिता हे अभियान राबविण्यात येत आहे, असे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी प्रास्ताविकात सांगितले.

गावातील नागरिकांना पथनाट्याद्वारे चला जाणूया नदीला अभियानाचे उद्दिष्ट, आपण नदीसाठी काय करु शकतो, आपण सर्वांनी मिळून नदी, नाले, ओढे पुन्हा वाहते करूया, पाणी वाचवूया, भूजल स्तर वाढवूया याबाबतचे महत्व सांगण्यात आले. यावेळी वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या नदी संवाद रथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.