संकटातून मार्ग काढत मुलांचे भवितव्य घडवावे- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड

संकटातून मार्ग काढत मुलांचे भवितव्य घडवावे– केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड

Ø कोरोनात दोन्ही पालक गमाविलेल्या मुलांना धनादेश वितरण

चंद्रपूर दि. 30 मे : कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. यामध्ये अनेक मुलांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमाविले आहेत. अशा मुलांचे शिक्षण, आरोग्य, काळजी व संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी व संकटातून मार्ग काढत मुलांचे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित पीएम केअर फॉर चिल्ड्रन या कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. कार्यक्रमाला डॉ. भागवत कराड यांच्यासह लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

गत दोन वर्षे कोविड-19 चा प्रादुर्भाव होता, असे सांगून डॉ. कराड म्हणाले, कोरोनामुळे देशात साधारणत: साडेचार हजार मुलांनी आपले आई-वडील गमावले आहे. त्यांचे पालनपोषण, शिक्षण, आरोग्य व संगोपनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री चाईल्ड केअर निधी (पीएम केअर फोर चिल्ड्रन) ही योजना 29 मे 2021 रोजी जाहीर केली. या माध्यमातून 23 वर्षाखालील मुलांना केंद्र सरकारमार्फत आर्थिक मदत देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत संबंधित जिल्हाधिकारी हे अशा मुलांचे पालक असतील. केवळ पालकच नाही तर त्यांची सर्वांगीण काळजी जसे की, आरोग्य, शिक्षण, राहण्याची व्यवस्था आदी जबाबदारी जिल्हाधिका-यांवर असेल.

श्री. कराड पुढे म्हणाले, चंद्रपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनात प्रधानमंत्री चाईल्ड केअर निधी अंतर्गत कोविड-19 या महामारीमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना धनादेशाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमाविलेल्या 11 मुलांना (18 वर्षावरील 3 व खालील 8) केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुलगा जर त्यांच्या नातेवाईकाकडे राहत असेल तर त्या मुलाला महिन्याला एक हजार रुपये आर्थिक मदत, मुलांची राहण्याची व्यवस्था नसेल तर प्रशासनामार्फत अशा मुलांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल.

या मुलांचा शैक्षणिक खर्च हा केंद्र सरकार करणार आहे. तसेच मुलगा मोठा झाल्यास मुलाच्या शिक्षणासाठी वर्षाला 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती, तांत्रिक शिक्षणासाठी 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती केंद्र सरकार देणार आहे. तर उच्च शिक्षणासाठी या मुलांना शैक्षणिक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल. तसेच आरोग्यासाठी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा केंद्र शासन देणार आहे.

तसेच या मुलांच्या काही समस्या व तक्रारी असतील तर चाईल्ड केअर पोर्टलच्या माध्यमातून प्रधानमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या समस्या व तक्रारींची दखल घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या मागे केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासन पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे डॉ. कराड म्हणाले. संकटावर मात करत मार्ग काढला पाहिजे व या मुलांचे भवितव्य घडविले पाहिजे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन अशा मुलांना मदत करावी.

यावेळी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड यांच्या हस्ते दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 11 मुलांना आर्थिक मदतीचे धनादेश, आरोग्य विम्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये 18 वर्षांवरील आयुष मेश्राम, पोर्णिमा जंबोजवार, मयुर डांगरी या लाभार्थ्यांचा समावेश आहे.