आदिवासी, गैरआदिवासी शेतकऱ्यांकडून शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

आदिवासी, गैरआदिवासी शेतकऱ्यांकडून शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि. 24 मे : आदिवासी विकास विभागाद्वारे भूमिहीनांना दारिद्रय रेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत चिमूर प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड व  ब्रह्मपुरी या पाच तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन आदिवासी कुटुंबांना सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ देण्याकरीता शेतीस उपयुक्त असणारी शेत जमिनीची आवश्यकता असून शेतजमीन खरेदी करावयाची आहे. त्याकरीता संबंधित तालुक्यातील आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून प्रचलित रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन विकण्यास तयार असल्यास मोबदला देय राहील.

दारिद्रय  रेषेखालील भूमिहीन आदिवासी कुटुंबांना उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्याने त्यांना रोजगार हमी योजना किंवा खाजगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागते. त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, याकरीता त्यांचे मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणे आवश्यक आहे.

जमीन विकण्यास तयार असलेल्या इच्छुक शेतकऱ्यांनी वर्ग-1 मध्ये असलेल्या जमिनीचा 7/12, गाव नमुना 8-अ, कर्ज थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र, सातबारावर नावे असलेल्या हिस्सेदारांचे रु. 100 च्या स्टॅम्पपेपरवर संमतीपत्र, विक्री करावयाच्या जमिनीचे क्षेत्रफळ, त्यावर इतरांचे अतिक्रमण नसल्याचे प्रतिज्ञापत्र, जमीन मोजणी विभागाची जमीन मोजण्याची क शिट व टाचण नकाशा, ज्या भागातील जमीन आहे त्या भागातील जमिनीचे शासकीय दराबाबत उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र इत्यादींसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क साधावा, असे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी कळविले आहे.