शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित Ø 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

Ø 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 4 मे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे.

दि. 9 मे 2022 पासून टॅलेंट सर्च मोहीम राबविली जाणार असून यात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना प्रवेश दिल्या जाणार आहे.  राज्यातील एकूण 9 क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाच्या वतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार विभागीय उपसंचालक कार्यालय, नागपूर येथे दि. 19 ते 20 मे 2022 या कालावधीत विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन करावयाचे आहे.  या चाचणीत निकषांची पूर्तता करून राज्यस्तर चाचणी करीता खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यामध्ये आर्चरी, ज्युडो, हँडबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल-टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक या खेळांचा समावेश आहे.

ज्या खेळाडूंचे वय 19 वर्षाच्या आतील आहे, अशा खेळाडूंची या निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी तंत्रशुद्ध प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, शासनाच्यावतीने मोफत पुरविल्या जाणार आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर सहभागी खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित करून तसेच राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल.

उपरोक्त क्रीडा प्रबोधिनी प्रवेश चाचणीकरीता पदक प्राप्त, राष्ट्रीय सहभागी खेळाडूनी दि. 17 मे 2022 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे व अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र व आधारकार्ड इत्यादी कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर येथे सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.