chandrapur I आरोग्य विभागाचा फौजफाटा मेहा येथे दाखल १०७ जणांची चाचणी; १० जण पॉझिटिव्ह

आरोग्य विभागाचा फौजफाटा मेहा येथे दाखल

१०७ जणांची चाचणी; १० जण पॉझिटिव्ह

सावली/ प्रतिनिधी
तालुक्यातील मेहा बुज हे अख्खे गाव तापाने फणफणत असल्याचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल झाल्यानंतर तालुका प्रशासनाने रविवारी तातडीने चाचणी शिबीर घेतले. यात एकूण १०७ जणांची चाचणी करण्यात आली. यात १० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

तालुक्यातील दीड हजार लोकसंख्या असलेल्या मेहा बु.येथे गत २ आठवड्यापासून तापाच्या साथीने हैराण झाले आहे. तापाच्या साथीने गावातील आबाजी पेंदाम, हरबाजी कोलते, शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्त वायरल झाले. त्याची दखल घेऊन पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाला तातडीने विशेष शिबिर लाऊन आरोग्य तपासणी करण्याची सूचना केली. त्यानुसार रविवारी अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विशेष शिबिर लाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी १०७ जणांची चाचणी करण्यात आली. यात १० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर सावली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोनाची दहशत असताना गावात तापाची प्रचंड साथ आली असून, सर्व घरांमध्ये तापाचे रुग्ण आहेत. या सर्वांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन सावली तहसीलदार पाटील यांनी केले आहे. आज रविवारी संवर्ग विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी गावात भेट दिली. गावात फेरफटका मारून पहाणी केली आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

आणखी शिबिराची गरज
आज झालेल्या शिबिरात तपासणी किट मोजक्याच आणण्यात आल्या होत्या. गावात ५०० हुन अधिक लोक तापाने आहेत. किट उपलब्ध न झाल्याने अनेकांना परत जावे लागले. आणखी शिबीर राबविण्याची मागणी केली जात आहे.