335 प्रलंबित आणि 697 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 335 प्रलंबित आणि 697 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

गडचिरोली,दि.30 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी मामल्याकरीता राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 335 प्रलंबित आणि 697 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले आणि रुपये 1,80,34,392/- वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरुपाच्या मामल्यांकरीता स्पशेल ड्राइव्हद्वारे फौ.प्र.सं. चे कलम 256 व 258 तसेच गुन्हा कबुलीचे एकुण 186 प्रकरणे निकाली काढण्यात आली. वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु.बी. शुक्ल यांनी साडी – चोळी व शेला देवून सत्कार केला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यु.बी. शुक्ल व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, आर.आर.पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

दिवाणी न्यायाधिश (व.स्तर), गडचिरोली, एम.आर. वाशिमकर यांनी पॅनल क्र.01 वर काम पाहिले, पॅनल क्र.02 वर मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली एम.व्ही. तोकले, यांनी काम पाहिले. आज दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषित करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.प्र.सं. कलम 256, 258 अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता तृतिय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.),गडचिरोली श्रीमती एन.सी. सोरते यांचे न्यायालय कार्यरत होते.

तसेच पॅनल क्रमांक 01 मध्ये पॅनल सदस्य म्हणून डी.एन. बावणे, विधी स्वयंसेवक, पॅनल क्रमांक 02 मध्ये पॅनल सदस्य म्हणून सौ.बी. एम.उसेंडी, विधी स्वयंसेविका यांनी काम केले.

सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि इतर वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.