स्वतःशीच निर्धार केला की मार्ग सापडतो  – संदीप कदम

स्वतःशीच निर्धार केला की मार्ग सापडतो  – संदीप कदम

भंडारा, दि. 22 : समाजामध्ये बदल करायचा तर स्वतःशीच निर्धार केला पाहिजे. स्वतःशी निर्धार केला की मार्ग सापडतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा येथील माविम प्रांगण मोहाडी कार्यालयात आढावा व नियोजन बैठकीदरम्यान ते बोलत होते.

21 व 22 एप्रिल 2022 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा जिल्हा कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय लोकसंचालित साधन केंद्राच्या कामाचा आढावा व नियोजन करण्याच्या अनुषंगाने आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी संदीप कदम पुढे म्हणाले, बचत गटातील महिलांनी शेतीकडे दुर्लक्ष करू नये. शेतीच आपल्याला विकासाची वाट दाखवू शकते. शेतीमुळे आज अनेक शेतकरी उच्चशिक्षण घेऊनसुद्धा शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. पशुपालन व शेती हे दोन्ही व्यवसाय नियोजनपूर्वक केले तर निश्चितच यश मिळते, असे मत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

21 एप्रिल रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर विभागाचे विभागीय संनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी राजू इंगळे यांनी लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसंचालित साधन केंद्राच्या चमुनेही आपापल्या तालुक्यातील कामाचे सादरीकरण केले.

22 एप्रिल रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी कामाचे नियोजन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. माविम नागपूर विभागातील उपजीविका समन्वयक हेमंत मेश्राम यांनी ई- बिझनेस या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक व सहयोगीनी यांनीही त्यांच्या कामाचे नियोजन सादरीकरण केले.

तुमसरे मिल्क प्रॉडक्टचे विनोद तुमसरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, तुमसरे मिल्क प्रॉडक्टचे विनोद तुमसरे, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, लेखाधिकारी मुकुंद देशकर, भावना डोंगरे, मनोज केवट यांच्यासह लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगीनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शामराव बोंद्रे, सरोज श्रीपाद व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.