जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 7 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 7 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत

भंडारा, दि. 22 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण आयोग तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. पक्षकारांनी आपली तडजोड पात्र प्रकरणे मोठ्या संख्येने लोक अदालतीमध्ये निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंजू शेंडे यांनी केले आहे.

न्यायालयात दाखल असलेली सर्व तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, दिवाणी दावे तसेच दाखलपूर्व तडजोड पात्र प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्येही लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, एन.आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे.

ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये निकाली काढायची आहेत. त्यांनी संबंधित न्यायालयात ताबडतोब अर्ज सादर करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंजू शेंडे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी केले आहे.