जलजागृती सप्ताहाचा जल पुजनाने शुभारंभ जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी केले जलपूजन

जलजागृती सप्ताहाचा जल पुजनाने शुभारंभ जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी केले जलपूजन

 

भंडारा दि 17: जल जागृती सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी. योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते वैनगंगा नदीच्या तिरावर जलपूजन करण्यात आले.

“पाणी अडवा, पाणी जिरवा” या मोहिमेत सर्वाना सहभाग घेण्याबाबत आवाहन केले. सिंचनाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाची कार्य प्रणाली महत्वाची असुन यामुळे देशाच्या विकासामध्ये बरीच मदत होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमुद केले. सध्यास्थितीत घरगुती वापरामध्ये ब-याच ठिकाणी शुद्धीकरण यंत्राचे (आरओ) पाणी वापरण्यात येत आहे. परंतु त्यामधील बाहेर पडणारे अशुध्द पाणी नाल्यामध्ये न सोडता त्याचा वृक्ष लागवडी करीता किंवा कपडे धुन्याकरीता वापर करणे जरुरी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही भागामध्ये पाण्यामध्ये वाढणारी जलपर्णी/वनस्पतीमुळे पाणी अशुध्द होत असल्याने, त्याची वाढ कमी कशी करता येईल याबाबत कार्यवाही आवश्यक आहे.

सिंचनाचा वापर फक्त भात शेती करीता न करता, फळ बागा लावणे तसेच नविन पीक पध्दती अवलंबुन शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. या करीता आपले गावातल्या पाणी वापर संस्था यांना योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यानी सांगितले.

या जलजागृती सप्ताहामध्ये विधार्थांचा सहभाग होत असल्याने पाणी बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यास बरीच मदत होईल.

जलजागृती सप्ताह कार्यक्रमाचे संमन्वयक अ.वि.फरकडे, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन विभाग, आंबाडी यानी प्रास्ताविक केले.यामध्ये त्यांनी या सप्ताहात घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची जसे जलपुजन/जलप्रतिज्ञा , मोटार सायकल रॅली, प्रभात फेरी,शेतकरी मेळावा, चित्रकला स्पर्धा/ प्रबोधन/पथनाटय,पाणी पट्टी वसुली व कृषी प्रबोधन, ईंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी यांची धरणावर भेट, पाणी वापर संस्था प्रतिनिधी करीता प्रबोधन व व्याख्यानमाला इत्यादी कार्यक्रमाची रुपरेषा समजावुन सांगितली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने सुहास मोरे, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी) यांनी भंडारा शहरात उन्हाळयामध्ये होणा-या पाणी टंचाई बाबत अवगत करुन पाण्याची बचत करणे आवश्यक असल्याचे नमुद केले.

तसेच गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ आंबाडी अंतर्गत उप अधिक्षक अभियंता श्री. सातपुते यांनी घरगुती कामामध्ये होणा-या पाण्याचा वापराबाबत अवगत करुन पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याबाबत सुचीत केले. यावेळी सामूहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर मोटार सायकल रॅलीचे कारधा लहान पुलापासुन सुरवात करुन, रॅलीचा समारोप तसेच कार्यक्रमाची सांगता शितला माता मंदीर येथे करण्यात आली.

उपरोक्त कार्यक्रमास कार्यकारी अभियंता श्री. गोडे, श्री. शर्मा, श्री. बानुबाकडे, श्री. कापगते तसेच भंडारा जिल्हा अंतर्गत जलसंपदा विभागाचे सर्व उपविभागीय अभियंता उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजनाची व्यवस्था क.सु. वेमुलकोंडा, अधिक्षक अभियंता व अध्यक्ष जलजागृती सप्ताह यांचे मार्गदर्शनाखाली अ.वि. फरकडे, कार्यकारी अभियंता व एस. आर. भुरे, उपविभागीय अभियंता यांनी सांभाळली.