कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर Ø 9 ते 17 मार्चपर्यंत गावागावात होणार जनजागृती

कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या

कल्याणकारी योजनांचा जागर

Ø 9 ते 17 मार्चपर्यंत गावागावात होणार जनजागृती

चंद्रपूर दि. 10 मार्च : आधुनिक काळात प्रचार – प्रसाराचे माध्यम बदलले असले तरी आजही कलापथकाच्या सादरीकरणातून होणारी योजनांची जनजागृती प्रभावी मानली जाते. त्यातच कोरोनामुळे गेली दोन वर्षे या कलाकारांना सादरीकरण करता आले नाही. याची दखल घेत व शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने कलापथकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 10 दिवसात कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जागर होणार आहे.

राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात शासनाने घेतलेले महत्वापूर्ण निर्णय, विविध योजनांची माहिती गावागावात देण्यासाठी जिल्ह्यात तीन कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांचा शुभांरभ 9 मार्चपासून करण्यात आला आहे. जनजागृती कला व क्रीडा मंडळाने मूल तालुक्यातील मारोडा, बोरचांदली येथे, रामजी सुभेदार कलापथकाने ब्रम्हपूरी तालुक्यातील मुडझा, भुजतुकुम आणि आवलगाव येथे तर लोकजागृती कलापथकाने पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना, नवेगाव (मोरे) आणि फुटाणा येथे सादरीकरणातून गावक-यांना योजनांची माहिती दिली.

यात प्रामुख्याने आघाडी सरकारची दोन वर्षातील कामगिरी, कोरोनाच्या संकटावर मात, शिवभोजन थाळी, कृषी, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, उद्योग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पर्यटन, सार्वजनिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोव्हीडमुळे कर्ता व्यक्ति गमाविलेल्या कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान योजना, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई, दिव्यांगाबाबतच्या योजनांची माहिती, घरकुल योजना आदींचा समावेश आहे.

            शासनाच्या योजना अतिशय सोप्या भाषेत थेट नागरिकापर्यंत पोहचाव्यात, या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा उपक्रम आयोजित केला आहे. प्रत्येक तालुक्यात चार किंवा पाच याप्रमाणे जिल्हाभरात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने गावक-यांनी कलापथकांच्या सादरीकरणाला उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.