लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली, प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन

लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली, प्रयोगासाठी

अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्रातील लोककला टिकून राहाव्यात, त्यांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि पारंपरिक लोककलांचे संवर्धन करण्यासाठी लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ही समिती कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे, त्यांची पात्रता तपासून अनुदान मंजूर करण्याचे काम करणार आहे.

पुनर्गठन केलेल्या समितीत तमाशासाठी मंगला बनसोडे आणि अतांबर शिरढोणकर, दशावतारसाठी देवेंद्र नाईक आणि तुषार नाईक मोचेमाडकर, खडीगंमतसाठी शाहीर अलंकार टेंभुर्णे आणि शाहीर वसंता कुंभारे, शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे आणि धनंजय खुडे, लावणीसाठी रेश्मा मुसळे आणि छाया खुटेगांवकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे समितीचे अध्यक्ष असतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत असेल.