एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजन सन 2022-23

एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजन सन 2022-23

 

भंडारा दि. 31: राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रचारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीन करारनामा झालेला असून राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल व फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभुत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व बायर्न क्ल्ब, जर्मनी यांचे करारानुसार क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या “एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप” स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा, विभाग व राज्य् अशा क्रमाने स्पर्धा आयोजन होणार असून राज्य स्पर्धेतून एकुण 20 खेळाडूंची निवड करुन त्यांना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भंडारा यांचे वतीने एफ.सी.बायर्न कप भंडारा जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धा (14 वर्षाखालील मुले फक्त) आयोजन दिनांक 13 ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात येणार असून खेळाडूं दिनांक 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेला असावा.

 

शालेय क्रीडा स्पर्धेसाठी सांघिक खेळासाठी उपलब्ध करुन दिलेला प्रवेश अर्ज दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे ऑफलाईन पद्धतीने जमा करावेत, अर्जासोबत खेळाडूंचे आधार कार्ड, जन्मदाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. स्पर्धेंत शैक्षणिक संस्था, शाळा, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब स्पर्धेत सहभागी होवू शकतात. प्रत्येक संघाने फुटबॉल खेळासाठी आवश्य्क क्रीडा साहित्य, गणवेश व आवश्यक बाबी स्वत:सोबत आणावे. स्पर्धेसाठी आपल्या फुटबॉल खेळाडूंचा (14 वर्षाखालील मुले) संघ उपस्थित ठेवावे व विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.