वरोरा येथे कापूस उत्पादक शेतक-यांसाठी चर्चासत्र       

वरोरा येथे कापूस उत्पादक शेतक-यांसाठी चर्चासत्र       

 

चंद्रपूर,दि. 24 : महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथील वखार महामंडळाचे प्रांगणात कापूस उत्पादक शेतकरी, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांसाठी मुल्य साखळीवर आधारित विविध विषयावर चर्चासत्र घेण्यात आले.

 

कार्यक्रमाला कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळाचे राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर, व्यापार व्यवस्थापक कुशाग्र मुंगी आणि विभागीय व्यवस्थापक दीपक बेदरकर, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे वरिष्ठ सल्लागार भाऊसाहेब टेमकर, वखार केंद्रांचे केंद्र प्रमुख प्रशांत चासकर, प्रकल्प व्यवस्थापक दक्षा जानी, तालुका कृषी अधिकारी गजानन भोयर आदी उपस्थित होते.

 

श्री. मनोहरे यांनी स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत कापूस उत्पादक शेतक-यासाठी असलेली प्रात्यक्षिके, मुल्य साखळी आधारित शेतीशाळा, प्रशिक्षण आणि क्षेत्रीय भेटी आदींबाबत सविस्तर माहिती दिली. स्मार्ट कॉटन प्रकल्प हा कापूस उत्पादक शेतक-यांना बाजाराशी जास्तीत जास्त समरस करण्यासाठी आणि योग्य मुल्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतक-यांनी कापसाची उत्पादकता वाढीसोबतच जिनिंग प्रक्रियेद्वारे सरकी आणि रूई या घटकामध्ये मिळणा-या नफ्यात आपली भागीदारी सुनिश्चित करावी. तसेच या प्रकल्पात असलेली पारदर्शकता आणि विश्वासार्ह्ता जोपासण्यासाठी सर्व घटकांनी काटेकोरपणे प्रयत्न करावे, असे त्यांनी आवाहन केले.

 

वरोरा तालुक्यातील कोंढाळा गावच्या कृषी क्रांती शेतकरी बचत गटाचे गट प्रमुख भानुदासबोधाने यांनी आपल्या गावातील 59 शेतक-यांचा 1244 क्विंटल कापूस एकत्र करून त्याच्या पारस कॉटन जिनिंग युनिट मध्ये 300 गाठी तयार केल्याबद्दल आणि त्या वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी श्री.चासकर, श्री. मुंगी आणि श्री. दीपक बेदरकर यांनी सहकार महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. टेमकर यांनी शेतमाल तारण कर्ज योजने बाबत माहिती दिली. तर वरोराचे केंद्र प्रमुख प्रशांत नवले यांनी वखार महामंडळाची शेतकऱ्यांसाठी असणारी भाड्यातील सूट मालाची सुरक्षा व उपलब्ध असलेले तारण कर्ज इत्यादींची सविस्तर माहिती दिली. प्रकल्प व्यवस्थापक दक्षा जानी यांनी शेतकऱ्यांसाठी कापूस वायदे बाजारचे महत्व, प्रक्रियेतील नफा अजून कसा वाढवता येईल व बाजारभावातील चढ उतार यातील जोखमीचे व्यवस्थापन – हेजिंग इ. बाबत माहिती दिली. या चर्चासत्रात उपस्थित शेतक-यांच्या विविध विषयावरील शंकांचे समाधान करण्यात आले.

 

कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विद्या रामटेके, कांचन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी ढोबे, यशवंत सायरे, हिरालाल बघेले, बळीराम डोंगरकर, गणेश वाबिटकर, संजय नारळे, कृषकोन्नती शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक बंडू डाखरे, कोरपना शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अबिद अली, वनराई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अजय पिंपळकर, कृषि क्रांती शेतकरी बचत गट, कोंढाळाचे प्रमुख भानुदास बोधाने आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.