नवीन दत्तक नियमानुसार मिळाले हक्काचे बालक

नवीन दत्तक नियमानुसार मिळाले हक्काचे बालक

 

भंडारा, दि. 13 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करुन सुधारित अधिनियम 2021 लागू करण्यात आले आहे. या नियमाच्या कलम 61 अन्वये दत्तक विधानाबाबतचे आदेश देण्याचे अधिकार हे जिल्हादंडाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेसंबधातील दत्तक ग्रहण प्रक्रियेच्या अधिन राहून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून बालकाच्या व भावी पालकांच्या घरी गृह भेटीद्वारे चौकशी करण्यात आली. या चौकशीचे अहवाल केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण यांना सादर करण्यात आले. या प्रकरणात प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या pre-Approval letter च्या आधारावर दत्तक आदेश पारीत करण्याकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम आदेशाकरीता प्रकरण सादर करण्यात आले होते.

 

दि. 11 जानेवारी 2023 रोजी नातेसंबधातील दत्तक प्रकरणात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सुनावणी घेवून एकाच दिवसात प्रकरण निकाली काढले त्यामुळे पालकास कायदेशीररित्या बालक दत्तक मिळाले आहे. या प्रकरणात पारीत झालेल्या आदेशामुळे पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी विलास कान्हेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे, संरक्षण अधिकारी कु. शिल्पा वंजारी, कायदा व परीविक्षा अधिकारी प्रियंका पशिने, डाटा एन्ट्री ऑपरेटर डिंम्पल बडवाईक यांच्या सहकार्यातून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

 

 

 

अशी आहे मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया

 

ज्या पालकांना मूल दत्तक घ्यायचे आहे त्यांनी दत्तक प्रक्रियेअंतर्गत बाळ दत्तक घेण्यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. दत्तक इच्छुक पालकांची गृहभेट, सामाजिक तपासणी, आवश्यक दस्ताऐवजाची पूर्तता झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत छाननी करुन आणि नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त झालेल्या pre-Approval letter प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करता येते.