शिवजयंती हा केवळ छत्रपतींचे स्‍मरण करण्‍याचा दिवस नसून रयतेचे राज्‍य निर्माण करण्‍याचा संकल्‍प दिवस – आ. सुधीर मुनगंटीवार

शिवजयंती हा केवळ छत्रपतींचे स्‍मरण करण्‍याचा दिवस नसून रयतेचे राज्‍य निर्माण करण्‍याचा संकल्‍प दिवस – आ. सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूरात भाजयुमोतर्फे शिवजयंती उत्‍सव उत्‍साहात संपन्‍न
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम रयतेच्‍या कल्‍याणाचा विचार केला. रयतेच्‍या हृदयातील सिंहासनाला त्‍यांनी कायम महत्‍व दिले. छत्रपतींचे नांव उच्‍चारताच आपल्‍या शरीरात एक उत्‍साह संचारतो, आपल्‍याला मोठी ऊर्जा मिळते. शिवजयंती हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्‍मरण करण्‍याचा, त्‍यांना आदरांजली वाहण्‍याचा दिवस नसून त्‍यांच्‍या संकल्‍पनेतील रयतेचे राज्‍य निर्माण करण्‍याचा संकल्‍प करण्‍याचा दिवस असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी बल्‍लारपूर येथे शिवजयंतीनिमीत्‍त आयोजित उत्‍सवात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बल्‍लारपूर शहरात आयोजित शिवजयंती उत्‍सवाला आ. मुनगंटीवार यांच्‍यासह भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्‍हाध्‍यक्ष तसेच बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, अजय दुबे, राजू दारी, राजू गुंडेटी आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
 
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, या जगात अनेक राजे झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेच्‍या मनातील ओळखणारा, त्‍यांचे सुखदुःख जाणणारा, त्‍यांच्‍या सुखदुःखात समरस होणारा जाणता राजा होते. जिजाऊ मॉंसाहेबांनी रामायण, महाभारतातील कथांच्‍या माध्‍यमातुन पराक्रमाचे संस्कार त्‍यांच्‍यावर बालपणापासून केले. १५ व्‍या वर्षी मावळयांसह तोरणा जिंकत स्‍वराज्‍याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवराय म्‍हणजे अलौकीक पराक्रमाचे धनी होते. दुस-यांच्‍या धर्माचा आदर, सन्‍मान करण्‍याची भावना, शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्‍याला दिली आहे. गनिमी कावा हा त्‍यांच्‍या युध्‍दतंत्राचा आत्‍मा होता. हे युध्‍दतंत्र जागतिक कुतुहलाचा व अभ्‍यासाचा विषय ठरले आहे. मराठयांच्‍या सर्व शत्रूंविरूध्‍द मराठयांनी या युध्‍दतंत्राचा वापर केलेला होता. मराठयांमध्‍ये स्‍वराज्‍याची प्रेरणा निर्माण होत असताना गनिमी कावा युध्‍दतंत्राने त्‍यांना अनेक विजय मिळवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास स्‍वामींनी केलेले वर्णन त्‍यांच्‍या अलौकीक व्‍यक्‍तीमत्‍वाचे वर्णन आहे. ते ख-याअर्थाने नितीवंत, पुण्‍यवंत, जाणता राजा आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.
 
यावेळी शिवजयंती निमीत्‍त भव्‍य मिरवणूक शहरातून काढण्‍यात आली. कार्यक्रमस्‍थळी आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते शिवरायांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले, शिवरायाच्‍या गौरवार्थ पोवाडा व सांस्‍कृतीक नृत्‍य असे कार्यक्रम यावेळी संपन्‍न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनावर आधारित सामान्‍य ज्ञान स्‍पर्धा व निबंध स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये बल्‍लारपूर शहरातील 33 शाळा आणि महाविद्यालयातील सात हजार विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला. यातील विजेते डॉली निषाद, श्रेय बडकेलवार, रूतुजा कुडे, टिना परसुटकर, मोहीनी साळवे, साहील केशकर यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते पारितोषीके वितरीत करण्‍यात आली.
 
कार्यक्रमाचे संचालन भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे व धर्मप्रकश दुबे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी काशी सिंह, शिवचंद व्‍दीवेदी, निलेश खरबडे,कांता ढोके, रेणुका दुधे, वैशाली जोशी, सारीका कनकम, जयश्री मोहुर्ले, स्‍वामी रायबरम, अरूण वाघमारे, महेंद्र ढोके, सुवर्णा भटारकर, रणंजय सिंह, मनीष पांडे, बुचय्या कंदीवार, पुमन मोडक, मिथीलेश पांडे, आदित्‍य शिंगाडे, प्रतीक बारसागडे, संजय बाजपेई, मोहीत डंगोरे, किशोर मोहुर्ले, येलय्या दासरफ, मौला नीषाद, मनीष रामीला, विशाल शर्मा, रींकु गुप्‍ता, गुलशन शर्मा, मनीष मिश्रा, राहूल कावळे, शिवाजी चांदेकर, महेश श्रीरंग, ओम पवार, केतन शिंदे, सतीश कनकम, प्रकाश दोतपेल्‍ली, सुधाकर पारधी, अशोक सोनकर, प्रचलित धणरे,अभिषेक सतोकर, विनय विश्वकर्मा,पियूष मेश्राम, शुभम बहुरीया, सतिश बांगडे, अरूण भटारकर, कार्तीक रामटेके, राजु दासरवार, राजेश कैथवास, रवी राठोड, घनश्‍याम बुरडकर, नंदू नाडमवार, शिवभोला सिंग, श्रीनिवास चेरकुतोटावार आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.