सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ आणि वनविद्या महाविद्यालयासाठी शासन सकारात्मक पालकमंत्री-विजय वडेट्टीवार

सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ आणि वनविद्या महाविद्यालयासाठी

शासन सकारात्मक पालकमंत्री-विजय वडेट्टीवार

Ø कृषी दिनी शेतक-यांशी साधला संवाद

Ø वसंतराव नाईकांमुळेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी

चंद्रपूर,दि. 1 जुलै :  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षात या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. तसेच हा संपूर्ण परिसर वनांनी व्यापला असल्यामुळे येथे लवकरच वनविद्या महाविद्यालय सुरू करण्यात येईल. या दोन्ही बाबतीत शासन सकारात्मक आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

हरीतक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जि. प. समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जि.प. सदस्य रमाकांत लोधे, पं.स.सभापती मंदा बाळबुधे, उपसभापती शिला कन्नाके, मधुकर मडावी, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. कोल्हे, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, शास्त्रज्ञ स्नेहा वेलादी, डॉ. सिडाम, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.  

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी वसंतराव नाईक यांच्या काळात झाली, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, त्यानंतर वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण, पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखे अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळेच प्रगत शेतीमध्ये महाराष्ट्राचा देशात अव्वल क्रमांक आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याचा काही भाग अशा पाच जिल्ह्यातून 65 लक्ष टन धानाचे उत्पन्न होते. शेतकरी सुखी होण्याची ही वाटचाल आहे.

सिंदेवाही येथे कृषी विद्यापिठाच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक आहे. येत्या दोन-तीन वर्षात येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करणे, हे आपले प्रथम प्राधान्य आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर वनविद्या महाविद्यालय स्थापन झाल्यास वनउपजांपासून शेतीला पुरक औषधी निर्माण होईल. त्याचे संशोधन या महाविद्यालयात केले जाईल. अनेक कृषी शास्त्रज्ञ येथे येण्यासाठी तयार आहेत. वनविद्या महाविद्यालयाचा 182 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बियाणे निकृष्ट असले तर शेतकरी अडचणीत येतो. त्यातच मावा, तुडतुडे आदी किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त असतो. त्यामुळे आता रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय शेती करणे आवश्यक आहे. रोहणी यंत्र व कृषी यांत्रिकीकरणासाठी 35 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी कृषीभुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दिनेश शेंडे आणि गुरुदास मसराम या शेतक-यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. महाले, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. कांबळे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.