9 कुक्कुटपालनाद्वारे आर्थीक समृध्दी आई महिला बचत गटाची यशकथा

यशकथा –

9 कुक्कुटपालनाद्वारे आर्थीक समृध्दी

आई महिला बचत गटाची यशकथा

बचत गटाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृध्द केले आहे. मात्र यात स्त्री साक्षरता ची आर्थिकता ही महत्वाची आहे. भंडारा जिल्ह्यात साडेसात हजाराहुन अधिक महिला बचत गटांशी जोडलेल्या आहेत. त्यांच्या आर्थिक समृध्दी सुरूवात केलेल्या या जिल्ह्यातील वंदना आगाशे या भगीनीची ही यशकथा.

पांजरा हे गाव तुमसर तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. ह्या गावामध्ये एकूण महिला विकास आर्थिक महामंडळ (माविम) 8 महिला बचत गट कार्यरत आहेत. पांजरा या गावामध्ये धानाची शेती व मजुरी करतात. या गावातील कुटुंब आपले दैनंदिन गरजा पूर्ण करण्याकरीता विविध काम करून आपली गरज पार पाडत असतात. त्यापैकी एक म्हणजे वंदना धर्मराज आगाशे यांची परिस्थिती सुध्दा काही खास नसल्यामुळे हे सुध्दा लोकांकडे मजुरी करायचे व आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांच्याकडे शेती नसल्यामुळे त्यांनी आपले उपजीविका सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले. नंतर त्यांनी आई महिला बचत गटाचे सदस्यत्व घेतले.

बचत गटात येण्यापूर्वी त्यांची परिस्थिती साधारण होती. घर व गाव इथपर्यंतच त्या मर्यादित होत्या. त्यांना बाहेरील व्यवहारांचे ज्ञान नव्हते. गटामध्ये आल्यानंतर त्यांना घराबाहेरील आथिक व्यवहार कसे करायचे याबद्दल अनुभव आले. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. गटातून आय.सी.आय.सी.आय बँकेचे कर्ज घेवून त्यांनी आपल्या पतीला डिजेचा (साउंड सिस्टीम) व्यवसाय लावून दिला. त्यांनी गटामार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळवली. स्वत: शेळ्या घेतल्या व आपली उपजिविका सुरू ठेवली.

डिजेचा व्यवसाय सुरू होताच त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. त्या उत्पन्नातून दोन मुले व एक मुलगी ह्यांचे शिक्षण सुरू होते. पंरतु 2019 मध्ये कोरोना काळात त्यांचा डिजे व्यवसायावर बंदी आली व त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले. काय करावे त्यांना सुचेनासे झाले. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र अंतर्गत कापडी पिशवी शिवण्याचे काम केले. लोकसंचालीत साधन केंद्र अंतर्गत बारदाना युनिट मध्ये बारदाना शिवणे व विक्री करण्याचे काम केले.

त्यांनी बचत गटामधून अंतर्गत कर्ज घेवून व शेळ्या विकून त्यांनी आपल्या घरी गच्चीवर टिनाचे शेड केले व कुक्कुटपालन युनिट टाकले. संपूर्ण कुटुंबाने मेहनत करून छोट्या पिल्लांपासून दोन ते अडिच किलोपर्यंत कोंबड्यांची दोन महिन्यात वाढ केली. त्या कोंबड्यांची विक्री करून तीन महिन्यात त्यांना 60 ते 70 हजाराचा नफा झाला. मेहनतीद्वारे आपला व्यवसाय आणखी मोठा करण्याचा प्रयत्न केला. बचतगटाने त्यांना खूप सहयता केली. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना आर्थिक स्थैर्य आपल्या परिवाराला मदत करून त्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत केली. तसेच घरच्या आर्थिक परिस्थितीत हातभार लावला.

वंदनाताई कोणत्याही गावातील सामाजीक कार्यात सहभाग घेतात, तसेच लोकसंचालीत साधन केंद्र अंतर्गत व सर्व स्पर्धेत हिरिरीने भाग घेतात. त्याची समाजात प्रतिष्ठा वाढली व नावलौकिक ही प्राप्त झाला.

कोरोनाच्या संकटातही आलेल्या कुकुट्टपालनाच्या संधीचे वंदनाताईने सोने केले. येणाऱ्या महिला दिनाच्या पार्शभूमिवर वंदनाताईच्या जिद्दीला नक्कीच दाद द्यावी लागेल.

शैलजा वाघ दांदळे,जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा