chandrapur I ग्रामीण भागात जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची दुरूस्‍ती करून विलगीकरणासाठी वापर करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

ग्रामीण भागात जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची दुरूस्‍ती करून विलगीकरणासाठी वापर करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

मुल शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आ. मुनगंटीवार यांनी घेतला आढावा

ग्रामीण भागात घरे छोटी असल्‍यामुळे, एकच शौचालय असल्‍यामुळे गृह विलगीकरणाची सोय योग्‍य पध्‍दतीने होवू शकत नाही त्‍यामुळे कोरोनाच्‍या रूग्‍णसंख्‍येत वाढ होत आहे. ही वाढ थांबविण्‍याच्‍या दृष्‍टीने गावपातळीवर शाळांची दुरूस्‍ती करून त्‍या शाळा कोविडसाठी वापराव्‍या तसेच कोरोना असेपर्यंत या शाळा कायमस्‍वरूपी विलगीकरणासाठी वापराव्‍या असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कोरोना रूग्‍णांच्‍या मृत्‍युची वाढती संख्‍या लक्षात घेता मृत रूग्‍णांच्‍या कुटूंबांची विस्‍तृत माहिती घेवून त्‍यांना आर्थिक मदत मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने शासकीय योजनांची माहिती त्‍या कुटूंबापर्यंत पोहचविण्‍याचे निर्देश देखील आ. मुनगंटीवार यांनी दिले.
 
दिनांक ११ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. या ऑनलाईन बैठकीत मुलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, उपनगराध्‍यक्ष नंदू रणदिवे, संवर्ग विकास अधिकारी, तहसिलदार, उपजिल्‍हा रूग्‍णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, तालुका वैद्यकिय अधिकारी आदींची उपस्थिती होती. कोरोनाचे संकट हे सध्‍यातरी दिर्घकालीन संकट आहे त्‍यामुळे उपाययोजनांचे स्‍वरूप सुध्‍दा दिर्घकालीन असावे असे आ. मुनगंटीवार यांनी सुचविले. आशा वर्कर यांना १०४ ऑक्‍सीमीटर आपण त्‍वरीत उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. मुल शहरात ऑक्‍सीजन जनरेशन प्‍लॅन्‍ट उभारण्‍याच्‍या दृष्‍टीने आपण जिल्‍हाधिका-यांशी चर्चा केली असल्‍याचे ते म्‍हणाले. आमदार निधीतुन मुल शहर व तालुक्‍यासाठी रूग्‍णवाहीका मंजूर केल्‍या असून ५० ऑक्‍सीजन बेड्स लवकरात लवकर तयार होतील यादृष्‍टीने युध्‍दपातळीवर तयार करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्‍ये लसीकरण हा अतिशय महत्‍वाचा घटक आहे. लसीकरणाचा लाभ जास्‍तीत जास्‍त नागरिकांना घेता यावा यादृष्‍टीने शर्थीचे प्रयत्‍न करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. जनजागरणावर विशेष भर देण्‍याची आवश्‍यकता सुध्‍दा त्‍यांनी यावेळी प्रतिपादीत केली. मुल शहर व तालुक्‍यात आतापर्यंत १९ रूग्‍णांच्‍या मृत्‍युची नोंद झाली आहे. अनेक कुटूंबांमध्‍ये घरातील प्रमुख गेल्‍यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. त्‍यांना आर्थिक मदत मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने शासकीय  योजनांची माहिती पुरविण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.
 
यावेळी मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम आणि तहसिलदार यांनी प्रशासनातर्फे करण्‍यात येणा-या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला नगरसेवक मिलींद खोब्रागडे, अनिल साखरकर, सौ. शांता मांदाडे, प्रशांत समर्थ, सौ. वनमाला कोडापे, सौ. विद्या बोबाटे, सौ. रेखा येरणे, सौ. आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, सौ. संगिता वाळके, सौ. वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, विनोद सिडाम, सौ. प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार, चंद्रकांत आष्‍टनकर, अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती.