भुमी अभिलेख कार्यालयातील नक्कल अर्ज विहित मुदतीतच निकाली
Ø गोंडपिपरी येथील भुमी अभिलेख उपअधिक्षकांचे स्पष्टीकरण
चंद्रपूर, दि. 30 : भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोजणी व इतर शासकीय कामासंदर्भात फिल्डवर असतात. मात्र असे असले तरी उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे नक्कल करीता आलेले अर्ज विहित मुदतीतच निकाली काढले जातात, असे स्पष्टीकरण गोंडपिपरी येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिक्षक अरुण व-हाडे यांनी दिले आहे.
गोंडपिपरी भुमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक (प्रतिलिपी लिपीक) प्रशांत देशमुख यांची 15 सप्टेंबर रोजी तहसीलदार, गोंडपिपरी येथील लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाकरीता उपस्थित राहण्याकरिता नियुक्ती करण्यात आली होती. या दिवशी श्री. देशमुख तहसिलदार, गोंडपिपरी यांच्या कार्यालयात हजर होते. त्यामुळे नक्कल करीता आलेले सर्व अर्ज त्यांच्या कपाटात असल्याने सदर दिवशी नक्कल पुरविण्यात आल्या नाहीत. मात्र दुस-या दिवशी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी कार्यालयात येऊन भुकरमापक देशमुख यांनी सर्व अर्ज नक्कल नोंदवहीत नोंदवून बाहेर काढून ठेवले.
उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गोंडपिपरी कार्यालयात 1 ते 22 सप्टेंबर या कालावधीत एकूण 112 नक्कलेचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी भूकरमापक श्री. देशमुख यांनी 25 नक्कल अर्ज निकाली केले. 22 सप्टेंबर रोजी 22 नक्कल अर्ज निकाली, 23 सप्टेंबर रोजी कार्यालयातील इतर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून 53 नक्कल अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. दिवसाअखेर 12 नक्कल अर्ज शिल्लक आहे. हे अर्ज विहीत मुदतीत निकाली काढण्याची दक्षता घेत असल्याचे गोंडपिपरी येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक अरुण व-हाडे यांनी कळविले आहे.