भेसळयुक्त विविध अन्नपदार्थाचा 17 लक्ष 26 हजार किमतीचा साठा जप्त
Ø अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
चंद्रपूर, दि. 30 : अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयाने सणासुदीच्या कालावधीत भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तूप, खाद्यतेल, मिठाई, भगर, शेंगदाना, बेसन व इतर असे एकूण 52 अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेला पाठविले. यात रिफाईड सोयाबीन तेल, व्हाईट बर्फी, शेंगदाना, तुप व टोस्ट् इत्यादी अन्नपदार्थाचा 14627 कि. ग्रॅ. वजनाचा किंमत 17 लाख 26 हजार 853 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
यात 6 लाख 382 रुपये किमतीचे रिफाईंड सोयाबीन, 1 लाख 75 हजार 560 रुपयांची व्हाईट बर्फी, 49 हजार 840 रुपये किंमतीचे खुले रिफाईंड सोयाबीन तेल, 6 हजार 240 रुपये किंमतीचे तूप, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे टोस्ट्, 6 लाख 74 हजार 600 रुपये किमतीचा शेंगदाना, 1 लाख 221 रुपये किंमतीचे बेसन इत्यादी अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशायावरून जप्त करण्यात आला आहे. सदर अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेत. सदर अन्नपदार्थाचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.
अन्न व्यावसासिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 च्या अंतर्गत नियमांचे पालन करूनच अन्न व्यवसाय करावा. तसेच ग्राहकांनी सुध्दा कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थांची तक्रार असल्यास त्यांनी सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, श्री. राजमलजी पुगलीया नगर, मुठाळ हॉस्पीटल जवळ, कोतपल्लीवार पेट्रोल पंपच्या मागे, नागपूर रोड, सिव्हील लाईन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे तथा सहायक आयुक्त (अन्न) प्र. अ. उमप यांनी कळविले आहे.