30 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन
Ø सिर्सी (ता. राजुरा) सरपंच अविश्वास प्रस्ताव प्रकरण
चंद्रपूर, दि. 25 : राजुरा तालुक्यातील मौजा सिर्सी येथील लोकनियुक्त सरपंच मंदा रविंद्र किन्नाके यांच्याविरुध्द दाखल झालेल्या तसेच 16 सप्टेंबर 2025 रोजी तीन-चतुर्थांश मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने राजुरा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर ग्रामसभेत खालीलप्रमाणे कामकाज करण्यात येईल. 1. विशेष ग्रामसभा घेण्याकरीता प्रचलीत नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक आहे. 2. विशेष ग्रामसभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करण्याकामी शिरगणना करण्याच्या पध्दतीने साध्या बहुमताने त्यास अनुसमर्थन देण्यात येईल. या कामी 1 ऑक्टोबर 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत 29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी ग्राहय धरण्यात येणार आहे. त्यामध्ये ग्रामसभा सदस्यांचा सहभाग नोंदविण्यात येईल. 3. सदर विशेष ग्रामसभेकरीता उपस्थित ग्रामसभा सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने व अविश्वास प्रस्तावाचे विरोधात अशा दोन पध्दतीने ग्रामसभा सदस्यांची शिरगणना केली जाणार आहे.
4. सदर दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन हे फक्त अविश्वास प्रस्तावावर अनुसमर्थन घेण्यासाठी असल्याने या दिवशी इतर विषयांवर चर्चा होणार नाही. 5. विशेष ग्रामसभेत उपस्थित राहुन शिरगणना पध्दतीने ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजुर झाला असेल तर सदरचा अविश्वास प्रस्ताव संमत झाला, असे समजण्यात येईल. 6. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहुन ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास प्रस्ताव फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील.
विशेष ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालय सिर्सी ता. राजुरा येथे 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. सदर विशेष ग्रामसभेत येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या पैकी कोणताही ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे, असे राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी कळविले आहे.