पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 132 उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 132 उमेदवारांची प्राथमिक निवड

चंद्रपूर, दि.18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 132 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

सदर रोजगार मेळाव्यात साई वर्धा पॉवर प्रा. लि. वरोरा, ओमॅट वेस्ट प्रा.लि. चंद्रपूर, विदर्भ क्लिक वन सोल्यूशन चंद्रपुर, जे.पी.असोशिएट, चंद्रपूर एस.बी.आय. लाईफ इंन्सूरन्स, चंद्रपूर, संसूर सृष्टी इंडिया प्रा.लि. चंद्रपूर, वैभव इंटरप्रायझेस, नागपूर, इत्यादी नामवंत कंपन्या उपस्थित होत्या. रोजगार मेळाव्यात 416उमेदवार सहभागी झाले होते त्यापैकी 132 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गडचांदूरच्या सहायक पोलिस निरीक्षक राधिका गायकवाड, तर प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे, प्राचार्य शैलेंद्र देव, सहायक आयुक्त अनिसा तडवी, राहुल बोढे आदी उपस्थित होते.

राधिका गायकवाड म्हणाल्या, उमेदवारांना चांगले जीवन जगायचे असेल तर मेहनत करावी. कोणतेही न्यूनगंड न बाळगता मिळेल ते काम करावे. अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न करावे व यश संपादन करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय गोरे म्हणाले, रोजगाराची संधी आपल्या दारी आली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी यांचा लाभ घ्यावा आपल्या व आपल्या कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावावा.

प्रास्ताविकात शैलेंद्र देव म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्या प्रगतीशिल जिल्हा आहे. आपल्या परिसरात भरपूर कंपन्या आहे. स्थानिक उमेदवारांना या संधीचा लाभ मिळावा म्हणून सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या गुणांचा सकारात्मक विचार करावा, असे सांगितले.

मुख्य आयोजक अनिसा तडवी यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता हे कौशल्य आत्मसात करण्याचे चार आधार स्तंभ असून ते उमेदवारांनी आत्मसात करावे. या विभागाच्या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा.