ब्रम्हपुरी; भीषण अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा मृत्यू
बातमी- मंगेश बनसोड
आरमोरी रोडवरील प्रज्वल बारसमोर शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मांगली येथील अजय आनंदराव कार (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय कार हा ब्रम्हपुरीतील प्रशांत पिलारे यांच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता . नेहमीप्रमाणे तो शनिवारी सकाळी घरून कावासाकी मोटारसायकलने ब्रम्हपुरीत आला होता. संध्याकाळी साडे सहा वाजता तो मांगलीकडे परतत असताना समोरून येणाऱ्या मिनी पिकअप (क्रमांक.MH-34BZ -3153) ने भरधाव वेगात येत अजय कार यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत अजय कार गंभीर जखमी झाला घटनास्थळी उपस्थित रोशन राऊत यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत अजय कार हा आनंदराव तुकाराम कार यांचा मुलगा असून, त्याच्या निधनाने मांगली गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी संबंधित मिनी पिक अप चालकाविरुद्ध IPC २०२३चे कलम १०६(१),२८१ तसेच मोटार वाहन कायदा १९८९अंतर्गत कलम १८४अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.