श्री गणेशोत्सवात चंद्रपूर पोलीसांचा चोख बंदोबस्त // चंद्रपूर जिल्हयात एकुण श्री गणेश मुर्ती  – १४८३१

श्री गणेशोत्सवात चंद्रपूर पोलीसांचा चोख बंदोबस्त

चंद्रपूर जिल्हयात एकुण श्री गणेश मुर्ती  – १४८३१

दिनांक २७/०८/२०२५ पासुन साजरा होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि सुरक्षितरित्या पार पडावा तसेच उत्सव कालावधीत कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडून कडेकोट/चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असुन २ हजार ५०० हून जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार महिला/पुरुष आणि १००० गृहरक्षक दलाचे महिला/पुरुष पुढील ११ दिवस तैनात राहणार आहेत. त्यांच्यासोबत महत्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडया, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, सी-६० पथक असा चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय श्री गणेश विसर्जनासाठी विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. श्री गणेश चतुर्थीपासुन अनंत चतुर्थीपर्यंत वाहतुक नियमनासाठी सुध्दा चंद्रपूर पोलीस दलाकडून आवश्यक पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असलेल्या प्रमुख श्री गणेश मंडपामध्ये व विसर्जन मिरवणुक दिवशी मिरवणूक मार्गावर व विसर्जन स्थळांवर हा बंदोबस्त करण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. पोलीस वॉचटॉवर, ध्वनीप्रणाली (पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम), बीट मार्शल्स, ई-पेट्रोलींग आणि साध्या वेषामधील पोलीसांची नेमणूक करुन अपघात, चोऱ्या किंवा अप्रिय घटना टाळल्या जाणार आहेत. या बंदोबस्तामध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाची समावेश असेल.

 

तरी, याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलीस व प्रशासनाद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचा पालन करुन सहकार्य करावे. बेवारस वस्तु आढळल्यास पोलीसांना त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी. कोणत्याही अफवा ला बळी पडु नये किंवा कोणत्याही प्रकारची खोटी अफवा सुध्दा पसरवू नयेत. नागरिकांनी नियमाचे भान ठेवुन श्री गणेशोत्सव उत्साहाने व जल्लोषात साजरा करावा. विशेषतः मंडप उभारणी व त्याची सुरक्षितता, श्री गणेश मुर्तीची सुरक्षा, मंडपात व मिरवणुकीच्या वेळी लहान मुलं/मुली, महिला व वरिष्ठ नागरिक व आजारी नागरीकांची काळजी घ्यावी. अॅम्ब्युलंस ला मार्ग खुला करावा. मंडपात व मिरवणुकीत करण्यात येणारी सजावट, देखावे हे आक्षेपार्ह नसावेत. सोशल मिडीयावरुन धार्मिक भावना दुखावणाऱ्या फोटो, चित्रफित, मजकुर प्रसारीत होणार नाही याची काळजी घ्यावी व काही आक्षेपार्ह बाब-प्रकार आढळुन आल्यास नागरीकांनी तात्काळ पोलीस मदतीसाठी जवळील पोलीस स्टेशन किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा.

यावर्षी चंद्रपूर जिल्हयात श्री गणेश मुर्तीची अंदाजे स्थापना –

खाजगी / घरगुती श्री गणेश मुर्ती – १२९७५

सार्वजनिक श्री गणेश मुर्ती स्थापना – लहान – ८७३ / मोठे – ६१३

जिल्हयात एकुण श्री गणेश मुर्ती  – १४८३१

एक गाव एक गाव  – ३७६

एकुण सार्वजनिक श्री गणेश मुर्ती – १८४७