क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

चंद्रपूर, दि. 25 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार 29 ऑगस्ट 2025 रोजी हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्या जन्म दिवसानिमित्त क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याकरीता संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व अशासकीय शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच क्रीडा संघटनांनी क्रीडा दिन साजरा करावा. तसेच विद्यार्थ्यांसाठी रॅली, सायकल रॅली, मॅरेथान स्पर्धा, विविध खेळांचे सामने, परिसंवाद, चर्चासत्र व आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे. स्थानिक उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करावा याशिवाय ‘हर गली हर मैदान खेले सारा हिंदूस्तान’, ‘खेले भी खिले भी’ या संकल्पना राबवाव्यात.

जिल्ह्यात व जिल्हा क्रीडा संकूल चंद्रपूर येथे 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत खेळाडूंची रॅली, मॅरेथान स्पर्धा, सायकल ऑन संडे व विविध क्रीडा विषयक उपक्रम घेण्यात येतील. जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल मधील विविध क्रीडा उपक्रमात व जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या क्रीडा उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी केले आहे.