ई- पीक पाहणी त्वरीत करून घेण्याचे आवाहन

ई- पीक पाहणी त्वरीत करून घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 8 : शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे 7/12 उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत महसुल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 2021 पासून संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.

सध्या खरीप हंगामातील पीक पाहणी कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरुपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲपचे अपडेट करून घ्यावे. खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी 1 ऑगस्ट 1 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतः पुर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यांत आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील.

तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी खरीप २०२५ ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पुर्ण करावी, असे चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी कळविले आहे.