शहरातील नागरीकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेण्याचे मनपाचे आवाहन
अंगदान-जीवन संजीवनी अभियान पंधरवडा
चंद्रपुर 5 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे “अंगदान – जीवन संजीवनी अभियान पंधरवडा” दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राबविला जात आहे.. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये अंगदानाविषयी जागृती निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने मनपा आरोग्य विभागामार्फत अवयवदानबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे 5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात यासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. नयना उत्तरवार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली.अवयवदान हे “मरणोत्तर दान” म्हणून याला सर्वोच्च मानले जाते. एका व्यक्तीच्या अंगदानामुळे 8 लोकांचे प्राण वाचू शकतात,अंगदान सुरक्षित, वैद्यकीय दृष्ट्या नियंत्रित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे.अंगदानामुळे दात्याच्या शरीराचा अपमान होत नाही; सन्मानपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. अंगदानाच्या एका निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आशा, आनंद आणि नवे भविष्य मिळू शकते.
डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड इ. अवयवांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन मिळते. काही अवयव (जसे की किडनी) प्रत्यारोपणामुळे रुग्णाला वर्षानुवर्षे चालणाऱ्या डायलिसिसपासून मुक्ती मिळते. कॉर्निया प्रत्यारोपणामुळे अंध व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते. एका अर्थाने मृत्यूनंतरही आपण समाजासाठी कार्य करू शकतो.
सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शन व जनजागृती प्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,सोनू थुल,अमित फुलझेले,सागर सिडाम,डॉ. नरेंद्र जनबंधू तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवयवदानासाठी कुठे संपर्क साधावा –
अवयवदान संकल्प अणि ऑनलाईन प्रतिज्ञा संदर्भात अधिक माहीतीसाठी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) च्या www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरील वेब पोर्टलच्या माध्यमातुन ऑनलाईन प्रतिज्ञेद्वारे नोंदणी करावी. अधिक माहीतीसाठी NOTTO च्या कॉल सेंटरशी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4770 यावर किंवा चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे संपर्क साधावा.
“अंगदानाविषयीचे गैरसमज बाजूला ठेवून, मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याचा संकल्प करा. आपल्या एका निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आशेचा किरण मिळू शकतो.” – विपीन पालीवाल,आयुक्त,चंद्रपूर शहर महानगरपालिका.








