‘श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद – तब्बल ५.५३ लाख व्ह्युव मिळवलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले माहितीपट
गडचिरोली, दि. २७ जुलै – ‘विदर्भाची काशी – श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ या माहितीपटाने समाज माध्यमावर लोकप्रियतेचे नवे शिखर गाठले आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियोजन भवन येथे झालेल्या औपचारिक कार्यक्रमात या माहितीपटाचे विमोचन झाले. त्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘फेसबुक’ पेजवर हा माहितीपट प्रसारित करण्यात आला असून, अवघ्या काही दिवसांतच त्याला तब्बल ५ लाख ५३ हजार व्ह्युव्स मिळाले आहेत.
हा माहितीपट माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयामार्फत साकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे विमोचन पार पडले होते.
माहितीपटाचे वैशिष्ट्य:
श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिर – ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, स्थापत्य व पुरातत्त्वीय महत्त्व या लघुपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मंदिर, नागर शैलीतील शिल्पकला, रामायण-महाभारतकालीन कोरीव कामे, तसेच विविध धार्मिक उत्सवांचे दृश्यरूप चित्रण.
धार्मिक व सांस्कृतिक समृद्धी – महाशिवरात्र, श्रावण सोमवारच्या गर्दीतील भक्तिरस, ‘विदर्भाचे खजुराहो’ म्हणून निर्माण झालेली कलात्मक ओळख.
पर्यटन विकासास चालना – माहितीपटाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत या प्राचीन स्थळाची ओळख पोहोचत आहे.
सामाज माध्यमातील यश
सदर माहितीपटाने फेसबुकवर विक्रमी ५,५३,२७५ हून अधिक व्ह्युव्स, अनेक शेअर्स आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे.
भविष्यातील दिशा
या माहितीपटामुळे जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठिकाणांची माहिती समाज माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नासही मोठी चालना मिळाली आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन व माहिती कार्यालयाकडून पुढील काळातही ‘गडचिरोली ग्लिम्प्स’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळावर आधारित अशाच दर्जेदार माहितीपटांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी यांनी सांगितले आहे.










