आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अधिक्षकांचे निवासी प्रशिक्षण

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मानसिक

आरोग्यासाठी अधिक्षकांचे निवासी प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 19 : आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर व बंगलुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲन्ड न्युरो सायन्स (NIMHANS) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रम आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आला होता.

प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार, प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी आर.टी. धोटकर, एस.जे. गौरकर, चिमूर प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी ए.एम. बेलेकर आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये NIMHANS तर्फे मास्टर ट्रेनर म्हणून शासकीय आश्रमशाळा चंदनखेडा येथील अधिक्षक धनेश पोटदुखे व जांभुळघाट येथील महिला अधिक्षीका शुभांगी ढवळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी दृकश्राव्य साहित्य, पीपीटी, व्हिडीओ, छायाचित्रे व प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुदृढ कसे ठेवावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत आत्मियता व आनंद कसा निर्माण करता येईल याचे प्रभावी प्रशिक्षण दिले.

प्रथम बॅचमध्ये प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत 30 अधीक्षक / अधीक्षिका आणि प्रकल्प कार्यालय, चिमूर अंतर्गत 12 अधीक्षक / अधीक्षिका, तर द्वितीय बॅचमध्ये प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 29 अधीक्षक / अधीक्षिका आणि प्रकल्प कार्यालय, चिमूर अंतर्गत 12 अधीक्षक / अधीक्षिका या प्रमाणे एकूण 83 अधीक्षक / अधीक्षिका सहभागी झाले होते.

प्रशिक्षणानंतर सहभागी अधीक्षक व अधीक्षिकांनी हसत-खेळत, अनुभवाधारित शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने सकारात्मक अभिप्राय नोंदवला. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी युवराज चव्हाण यांनी तर राहुल गोंडाणे यांनी आभार मानले.