चंद्रपूर जिल्ह्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यात येणार

चंद्रपूर जिल्ह्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यात येणार

राजुरा आणि जिवती येथील प्रलंबित समस्यांवर महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई दि. १५ : जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले असून त्यानुसार लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमाभागातील गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगितले.

विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित विविध विषयांवरील बैठकांमध्ये ते बोलत होते. बैठकीला आमदार देवराज भोंगळे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा,आणि जिवती तालुक्यातील १४ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

वर्ग २ जमिनींना वर्ग १ चा दर्जा मिळण्यास मदत

जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित वर्ग-२ च्या जमिनींना वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. विशेषतः, राजुरा शहरातील सर्व्हे क्रमांक १ ते ८ मधील वर्ग- २ च्या जमिनींना विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या जमिनींच्या मालकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे.

वन जमिनींच्या पट्ट्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वन जमिनींचे पट्टे देण्याचा निर्णयही महसूलमंत्र्यांनी जाहीर केला. यामुळे अनेक वर्षांपासून वनजमिनींवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत.

संजय गांधी योजनेतील पदभरतीला हिरवा कंदील

संजय गांधी योजनेतील सात पदांचा आकृतीबंध मंजूर असूनही अद्याप भरती न झाल्याने महसूलमंत्र्यांनी ही पदभरती तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले. यामुळे योजनांच्या अंमलबजावणीला वेग येणार आहे.

जिवतीमध्ये कोतवाल पद लवकरच भरणार

जिवती तालुक्यात कोतवालांचे पद रिक्त असल्याने प्रशासकीय अडचणी येत होत्या. यावर, कोतवालांच्या नियुक्तीसाठी पाठवलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाज सुव्यवस्थित होण्यास मदत होईल.