महाराष्ट्राला ‘सौर’ ऊर्जावान बनवण्यासाठी महावितरणची गरुडझेप

महाराष्ट्राला ‘सौर’ ऊर्जावान बनवण्यासाठी महावितरणची गरुडझेप

नागपूर, दि. 14 जुलै 2025: महाराष्ट्राला हरित आणि ऊर्जा-स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने महावितरणने आपले पाऊल वेगाने पुढे टाकले आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून, प्रदूषणमुक्त आणि शाश्वत ऊर्जेच्या प्रसाराला महावितरणने आता आपले प्रमुख ध्येय बनवले आहे. यामुळे केवळ ग्राहकांची विजेची बिले कमी होत नाहीत, तर पर्यावरणाचेही संरक्षण होत आहे.

सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले: शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फ़डणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अत्यंत प्रभावी ठरत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे हा आहे, जेणेकरून त्यांना सिंचनासाठी रात्रीच्या विजेवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे पिकांचे नुकसान टळते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते. महावितरण यासाठी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीवर भर देत आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील ऊर्जा गरजा पूर्ण होण्यास मदत होत आहे.

‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ ठरली वरदान: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ महाराष्ट्रात महावितरणच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवली जात आहे. ही योजना घरगुती ग्राहकांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत घरांच्या छतांवर सौर पॅनेल बसवून ग्राहक स्वतःची वीज स्वतःच निर्माण करत आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 31 हजार 211 कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला असून, 884 मेगावॅटहून अधिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यात नागपूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 36 हजार 750 कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेत तब्बल 144 मेगावॅटहून अधिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या योजनेमुळे ग्राहकांच्या मासिक वीजबिलाचा ताण कमी झाला असून, अनेक घरांमध्ये विजेचे बिल शून्य येत आहे.

याशिवाय, ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेत राज्यातील सहा जिल्ह्यांमधील 63 गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच, महावितरणने 100 गावांना सौर ऊर्जेवर पूर्णपणे स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ‘सौर ग्राम योजना’ सुरू केली आहे. यामुळे निवडक गावांमध्ये दिवसा पूर्णवेळ वीज उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’: पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेप्रमाणेच, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ ही एक अत्यंत महत्त्वाची आणि यशस्वी योजना ठरत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी शाश्वत आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे पारंपरिक वीज पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होते आणि डिझेल पंपांचा खर्च वाचतो. महाराष्ट्र सरकारने आगामी पाच वर्षांत 10 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे 10 लाख एकरापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येणार आहे. आतापर्यंत राज्यात विविध योजनांमध्ये 5 लाख 65 हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.

हरित ऊर्जा खरेदी करार: महावितरणने पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पांकडून मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जा खरेदी करण्याचे करार केले आहेत. यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील ताण कमी होत आहे.

महावितरणचा ‘गो-ग्रीन’ उपक्रम पर्यावरणासाठी: महावितरणचा ‘गो-ग्रीन’ उपक्रम हा केवळ सौर ऊर्जेपुरता मर्यादित नसून, तो पर्यावरणपूरक दृष्टीकोन दर्शवतो. या उपक्रमात 5 लाखांहून अधिक ग्राहक सहभागी झाले आहेत. हे ग्राहक छापील वीजबिलांऐवजी डिजिटल बिले स्वीकारत आहेत. यामुळे वर्षाला कोट्यवधी रुपयांच्या कागदाची बचत होत आहे, जे अप्रत्यक्षपणे पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करते.