मलनिःसारण योजनेअंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती 13 पैकी 7 किमी रस्त्यांचे दुरुस्तीकरण पूर्ण नवीन काम हाती न घेण्याचे कंत्राटदारास निर्देश

मलनिःसारण योजनेअंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती

13 पैकी 7 किमी रस्त्यांचे दुरुस्तीकरण पूर्ण

नवीन काम हाती न घेण्याचे कंत्राटदारास निर्देश

चंद्रपूर 14 जुलै – चंद्रपूर शहरात मलनिःसारण योजना राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध भागांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे. या कामासाठी एकूण 13 किलोमीटर लांबीचे सिमेंट व डांबरी रस्ते खोदण्यात आले होते. सदर कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता, महानगरपालिकेने तात्काळ रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले असून आतापर्यंत 7 किलोमीटर रस्त्यांचे दुरुस्तीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

यासंबंधी नुकतीच मा. आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कामाला भेट दिली होती. तसेच इतरही लोकप्रतिनिधींनी रस्ते खोदण्यासंबंधी तक्रारी दिल्या होत्या त्यानुषंगाने आयुक्त विपीन पालीवाल यांनी उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करण्याचे तसेच पावसाळा संपेपर्यंत कुठलेही नवीन काम हाती न घेण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले आहे. नागरिकांना त्रास होईल अश्या स्वरूपाचे काम निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.

नागरिकांना पुन्हा एकदा पूर्ववत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छता व पर्यावरणपूरक उपाययोजनांना चालना.शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेअंतर्गत महत्त्वाचे प्रकल्प मनपातर्फे हाती घेण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा यंत्रणा तसेच मलनिःस्सारण योजनेच्या कामासाठी शहरातील विविध भागांमध्ये अनेक रस्त्यांवर खोदकाम करावे लागले होते. या रस्त्यांचे पुनर्बांधकाम, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.

मलनिःस्सारण योजनेअंतर्गत 32 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन बालाजी वॉर्ड,ठक्कर कॉलनी,समाधी वॉर्ड,लालपेठ,बाबुपेठ येथील रस्त्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या बघता मलनिःस्सारणाची योग्य व्यवस्था हे दीर्घकालीन नियोजनाचे पाऊल आहे.

यामुळे मोकळ्या नाल्यांमध्ये सांडपाणी जाण्याऐवजी ते प्रक्रिया केंद्रात गेल्याने शहरात दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण कमी होणार आहे. पुनर्वापर केलेले सांडपाणी बागायती,सिमेंट उद्योग,औद्योगिक वापर,वाटर स्प्रे बांधकामासाठी वापरता येईल. खुल्या नाल्यांमुळे रोगकारक जंतु व जी दुर्गंधी पसरते त्यावर मलनिःस्सारण प्रकल्पामुळे आळा घालता येऊ शकतो. तसेच यामुळे सुदृढ आरोग्य पातळीत वाढ होऊन मच्छरांचा त्रासही कमी होतो.

सदर कामांमुळे काही भागांतील नागरिकांना तात्पुरती गैरसोय झाली असली, तरी या दीर्घकालीन प्रकल्पांमुळे शहराला भक्कम व टिकाऊ पायाभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.