अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही – शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही – शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. ९ :- राज्यातील ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांना विविध शाखेमध्ये तसेच विविध भागात जास्तीत जास्त संधी मिळावी, यासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अवलंब केला आहे. राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.

ग्रामीण भागात लागू करण्यात आलेली अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावी, यासंदर्भात विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे प्रश्न विचारला होता. या लक्षवेधी दरम्यान सदस्य राजेश राठोड, डॉ. परिणय फुके, एकनाथ खडसे यांनीही सहभाग नोंदविला.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, महानगर भागात राबविण्यात येत असलेली ऑनलाईन प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली जात आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत मागे राहू नये, हा उद्देश आहे. यामुळे खेड्यातील विद्यार्थ्याला शहरी भागात प्रवेश घेता येऊ शकेल. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक फायदे असल्याचेही डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यातील शाळेत २१ लाख विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात ११ लाख विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे दिसते. त्यामुळे पारदर्शकतेसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आवश्यक असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, पूर्वी अकरावीमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजची 500 रुपयांपर्यंत माहितीपुस्तिका विकत घ्यावी लागायची. आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने अतिशय कमी किमतीत प्रवेश मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.