वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन – वनमंत्री गणेश नाईक

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. ८ : वनालगतच्या जमिनीच्या शेतकऱ्यांना प्रति एकर वार्षिक 50 हजार रुपये देऊन शासनाने त्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि सोलार कुंपण घालावे, अशी योजना शासनाच्या विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सदाशिव खोत यांनी लातूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

वनमंत्री श्री.नाईक म्हणाले, राज्यात वन्यजीवांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचा त्रास होत आहे, ही बाब खरी आहे. वनक्षेत्रालगत सोलार कुंपणासाठी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोलार बनवणाऱ्या कंपन्यांसोबत महाराष्ट्र वन विकास महामंडळामार्फत करार करण्यात येईल. येथे केवळ सोलारच्या माध्यमातून वीज निर्मितीच नव्हे तर वन्य प्राणी खाणार नाहीत आणि आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार होईल असे पाम रोजा नावाचे गवत विकसित करण्याची योजना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वनालगत बफर झोन आणि लगतच्या शेतकऱ्यांसाठी सोलार कुंपण घालण्याची चांगली योजना आणत असल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे यावेळी अभिनंदन केले. यामाध्यमातून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमधून नागरिकांचे जीव वाचवण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.