चंद्रपूर महापालिकेत ‘हाय सिवेज सक्शन मशीन’ दाखल
आधुनिक तंत्रज्ञानाने स्वच्छतेला येणार वेग
चंद्रपूर 4 जुलै – चंद्रपूर शहरात नाली सफाईचा कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात आजपासून ‘ट्रक माउंटेड – हाय सिवेज सक्शन मशीन’ कार्यान्वित करण्यात आली आहे.
सदर मशीनद्वारे आता शहरातील विविध भागांतील भूमिगत नाले,गटार, मेनहोल्स, व नाल्यांची सफाई अधिक जलद, कार्यक्षम आणि यांत्रिक पद्धतीने होणार आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्वच्छता कार्यात लागणारा वेळ आणि श्रम यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असून, विशेषतः पावसाळ्यातील नालेसफाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व स्वच्छता विभागाच्या देखरेखीखाली मशीनचे ट्रायल रन करण्यात आले.
यावेळी मशीनची शोषण क्षमता, दाब नियंत्रण, आणि जलप्रवाह व्यवस्थापन याची तपासणी करण्यात आली.सदर मशीनची क्षमता ही 4000 लिटरची असुन बंद गटारांमधून त्वरित सांडपाणी काढण्यासाठी, पावसाळ्यात नाले तुंबल्यास तत्काळ सफाईसाठी, गंध व दुर्गंधीमुक्त परिसर राखण्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. सीवेज लाइन्स, ड्रेनेज सिस्टीम आणि इतर भागातील मलबा, गाळ आणि द्रव काढण्यासाठी हे मशीन शक्तिशाली सक्शन वापरते. मनपाच्या वतीने ही आधुनिक मशीन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करण्यात येत आहे. यामुळे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
हे कसे कार्य करते:
मशीनमध्ये एक शक्तिशाली सक्शन पंप आहे जो नोजल किंवा ट्यूबद्वारे सीवेज लाइनमध्ये सक्शन तयार करतो. हे सक्शन मशीनच्या टाकीमध्ये चिखल आणि द्रव खेचते. नंतर टाकी रिकामी करून ती कचरा विल्हेवाटीसाठी नेली जाऊ शकते.
फायदे:
कार्यक्षमता: ही मशीन कमी वेळेत सांडपाणी साफ करू शकते.
परिणामकारकता: ही मशीन मोठ्या प्रमाणातील नालीचा गाळ व चिखल देखील काढू शकते.
सुरक्षा: ही मशीन सफाई कामगारांना धोकादायक परिस्थितीत काम करण्यापासून वाचवते.
पर्यावरण संरक्षण: हे यंत्र सांडपाणी स्वच्छ करून पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
खर्च प्रभावी: या यंत्रामुळे सांडपाणी साफ करण्याचा खर्च कमी होऊ शकतो.