जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार Ø खाजगी रुग्णालयांना शासकीय पॅनलवर घेण्याबाबत प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार

Ø खाजगी रुग्णालयांना शासकीय पॅनलवर घेण्याबाबत प्रक्रिया सुरू

चंद्रपूर, दि. 2 : जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 30 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांचा तसेच एकल विशेषत: (Single Speciality) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होईल.

पात्र एकल विशेषता 10 खाटांचे रुग्णालय : 1) नाक, कान, घसा 2) नेत्रविकार 3) अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा 4) भाजणे 5) बालरोग शस्त्रक्रिया 6) कर्करोग उपचार युनिट्स 7) नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स 8) हिमोडायलिसिस मूत्रपिंडशास्त्र युनिट्स

पॅनलवर समावेश प्रक्रिया : 30 पेक्षा जास्त खाटा असलेली रुग्णालये आणि एकल विशेषता असलेली 10 खाटांची रुग्णालये, जी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटी निकषांची पूर्तता करतील, अशी रुग्णालये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या पॅनलवर समावेशासाठी पात्र ठरतील. यामध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे.

लाभ : पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील. यामुळे गंभीर आजारांवरील उपचार परवडणारे होतील आणि रुग्णांवर पडणारा आर्थिक भार कमी होईल.

अर्ज प्रक्रिया : रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी https://www.jeevandayee.gov.in (MJPJAY) या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करावा. तसेच, चंद्रपूर जिल्हा रुग्णालय जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत व उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पात्र खाजगी रुग्णालयांनी आयुष्मान भारत व म. फुले जनआरोग्य योजनांच्या शासकीय पॅनलकरीता प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांना जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती https://www.jeevandayee.gov.in या संकेत स्तळावर उपलब्ध आहे.

संपर्क : अधिक माहितीसाठी किंवा पॅनलवर समावेशासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 9136158619 वर संपर्क साधावा किंवा https://www.jeevandayee.gov.in वर भेट द्यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.