महावितरणचे स्मार्ट मीटर प्रीपेड नव्हे तर पोस्टपेडच – संचालक सचिन तालेवार

महावितरणचे स्मार्ट मीटर प्रीपेड नव्हे तर पोस्टपेडच – संचालक सचिन तालेवार

नागपूर, 22 जून 2025: महावितरणकडून बसवण्यात येत असलेले स्मार्ट मीटर हे ‘प्रीपेड’ नसून, नेहमीच्या मीटरप्रमाणे ‘पोस्टपेड’च असतील, असे महावितरणचे संचालक (संचलन व प्रकल्प) सचिन तालेवार यांनी आज (दि. 22) नागपूर येथे सांगितले. या नव्या मीटरमध्ये केवळ ‘कम्युनिकेशन’ची अतिरिक्त सुविधा उपलब्ध असून, यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापराचे अधिक प्रभावीपणे नियोजन करता येणार आहे.

संचालक तालेवार यांनी स्पष्ट केले की, थकबाकीदार ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी 15 दिवसांची पूर्वसूचना दिली जाईल. विशेष म्हणजे, मोबाईल ॲपद्वारे ग्राहक आपल्या वीज वापराचे सविस्तर निरीक्षण करू शकतील आणि त्यावर नियंत्रण ठेवू शकतील. नागपूर येथील विद्युत भवन कार्यालयात आयोजित नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या पाचही परिमंडलांच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.

ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा आणि त्यांच्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यावर विशेष भर देण्याच्या सुचना करीत त्यांनी मार्च 2025 च्या तुलनेत वाढलेली थकबाकी या महिन्यात शंभर टक्के वसूल करण्याचे तसेच चालू मागणीची संपूर्ण वसुली करण्याचे निर्देश तालेवार यांनी दिले. ग्राहक मॅपिंग, लोड शिफ्टिंग, एमएफ समस्या यांसारख्या विविध कारणांमुळे होणारे नकारात्मक आणि असामान्य नुकसान त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी यावेळि दिले. एकाच पत्त्यावर असलेल्या एकापेक्षा अधिक वीज जोडण्यांची पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही तालेवार यांनी दिले. नवीन वीज जोडण्या आणि वीज भार (लोड) वाढवण्याची प्रकरणे विहित मुदतीत पूर्ण करण्यासोबतच सौर प्रकल्प सुरू होण्यापूर्वी सर्व प्रणाली मजबुतीकरणाची कामे पूर्ण करावीत. रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एजन्सींना पुरेसे साहित्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यासोबतच कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, शेतीला दिवसा वीज पुरवठा, प्रधानंत्री सुर्यघर मोफ़त वीज योजना, वाहिनी विलगीकरण, सौरग्राम, मॉडेल सौर व्हीलेज, उपकेंद्र सक्षमीकरण, अधिक वीज हानी असलेल्या वाहिन्या, पैसे भरूनही प्रलंबित वीज जोडण्या, वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती या विषयांचा देखील आढावा संचालक तालेवार यांनी यावेळी घेतला.

या बैठकीला मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, हरिश गजबे, राजेश नाईक, अधीक्षक अभियंता सर्वश्री अमित परांजपे, मंगेश वैद्य, संजीव वाकडे, अनिल वाकोडे, दिपक देवहाते यांच्यासह नागपूर शहरातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.