महावितरणच्या वर्धापनदिनाला विद्युत सुरक्षा अभियानाची जोड;
विविध उपक्रमांमध्ये 2 लाख सुरक्षा दूतांचा सहभाग
मुंबई, 17 जून 2025: विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महावितरणने यंदा 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘प्रकाशमान महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र’ या विद्युत सुरक्षा अभियानाला सुरवात केली. त्यानिमित्त आयोजित सप्ताहामध्ये सुरक्षा दूत म्हणून तब्बल 1 लाख 97 हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या 20 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लोकाभिमुख विद्युत सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे.
विद्युत सुरक्षा अभियानातील सुरक्षा सप्ताहाचा नुकताच समारोप झाला. यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक, संचालक श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह मुख्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली.
विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यासाठी 16 परिमंडलांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. मानव संसाधन विभागाचे संचालक श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांच्यासह 11 हजार 323 अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे शालेय विद्यार्थी, नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजूषा घेण्यात आली. घरगुती व सार्वजनिक विद्युत सुरक्षेच्या ऑनलाइन प्रश्नमंजूषेत तब्बल 95 हजार 292 जणांनी प्रतिसाद दिला. यात तब्बल 10 हजार 827 शालेय विद्यार्थी तसेच 84 हजार 466 नागरिक व महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या सर्वांना ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यासह राज्यभरातील 146 विभाग कार्यालय अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यास 7 हजार 857 शालेय विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला व विद्युत सुरक्षेच्या संदेशांचे रंगबिरंगी चित्र रेखाटले. विजेत्यांना बक्षिसे व सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. विद्युत सुरक्षेच्या जागरासाठी बाईक रॅली, प्रभात फेरी तसेच बसस्थानके, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, गर्दीचे ठिकाणे व रहिवासी सोसायट्यांमध्ये महावितरणच्या 59 हजारांवर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाखो नागरिकांशी थेट संवाद साधला व विद्युत सुरक्षेची माहिती दिली. अनेक ठिकाणी पथनाट्ये व माहिती पत्रकांद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला.
राज्यातील महावितरणच्या 1 कोटी 92 लाख 79 हजार ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला तर 35 लाख 73 हजारांवर ग्राहकांना नोंदणीकृत इमेलद्वारे ‘विद्युत सुरक्षेबाबत काय करावे व काय करू नये’ याबाबत माहिती देण्यात आली. दि. 5 जूनला ‘पर्यावरण दिना’निमित्त वीजबचतीचा राज्यभरात संदेश देण्यात आला. विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप करताना महावितरणच्या वर्धापनदिनी, दि. 6 जूनला सकाळी 10 ते 10.15 वाजेदरम्यान एकाच वेळी सुमारे 34 हजारांवर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली. विद्युत सुरक्षा अभियान अंतर्गत यापुढेही विद्युत सुरक्षेचा जागर सातत्याने करण्यात येणार आहे.