मनातील पान :- भाग : 2     

मनातील पान :- भाग : 2     

लेखक – मनोज मेश्राम 

भर उन्हात दिवसभर काम करून थकलेले शरीर विसावा मागतो आहे, पण तुझी आठवण सुखाने विसावा सुद्धा घेऊ देत नाही. किती अभागा आहे ग मी, मला सुखाने झोपताही येत नाही आणि जगताही येत नाही. मग आता तूच सांग ना… काय करू गं? रखरखत्या त्या भर उन्हात काम करतांना शरीराच्या प्रत्येक

अंगा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्या निघालेल्या घामाने शरीर अगदी शीन झालं होत. त्याला शांत निवांत झोप हवी होती, पण… मन झोपायला तयार नव्हतं. कारण त्याला तुझी काळजी होती. त्या काळजीने एक प्रश्न उभा केला, ‘ are you ok?’

आज तूझ्या आठवनिन मला कसं बेचिराख करून सोडलंय बघ… सारखे तुझेच विचार!.. मला सारं काही आठवतंय… तो तुझा निरागस चेहरा… त्या निरागस चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य आणि त्यामुळे गालावर उमटलेली खळी… ते स्मित हास्य माझ्या जगण्याचे ध्येय… जगण्याची उमेद… तुझ्या एका हास्यासाठी काही पण करायला तयार असलेला तुझा मी दिवाना… कदाचित आज तुझ्या स्मरणात सुद्धा नसेल! आठवतो का मी तुला? नाही ना!.. बर असू दे.

खरं सांगू प्रिये, आता खूप रात्र झाली आहे. दुरवर काळाकुठ्ठ अंधार पसरला आहे, कुणी चिट पाखरू ही दिसत नाही आहे. अधून मधून रात किळ्यांचा आवाज येतो आहे. वातावरण अगदी शांत निवांत आहे, सारा गाव झोपला आहे. अशा वेळी वाऱ्याची एखादी झुळूक येते आहे आणि मनाला प्रसन्न करून जाते आहे. प्रिये रात्र खूप झाली आहे पण… गेल्या कित्येक दिवसा पासून मी हसलो नाही आहे पण आज का कुणास ठाऊक! तुझ्या स्मृती ना उजाळा देऊन मी वेड्या सारखा एकटाच हसतो आहे.

माझे राणी हसू दे मला एकदाच! कारण या नंतर मला हसायला मिळणार आहे नाही? माहित नाही. आनंदाचे दोन क्षण माझ्या वाट्याला येऊ दे…

तुला सारं काही सांगायचं आहे. आणि या जगाचा निरोप घ्यायचा आहे…     क्रमशः