मान्सुनपूर्व तयारी अतिशय गांभिर्याने करा Ø जिल्हाधिका-यांचे संबंधित यंत्रणेला निर्देश

मान्सुनपूर्व तयारी अतिशय गांभिर्याने करा

Ø जिल्हाधिका-यांचे संबंधित यंत्रणेला निर्देश

चंद्रपूर : आगामी काही दिवसांत मान्सुनला सुरवात होणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी सध्या आपल्याजवळ 15 ते 20 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत सर्व यंत्रणांनी मान्सुनपूर्व तयारी अतिशय गांभिर्याने करून घ्यावी. तसेच आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वांनी अलर्ट राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

नियोजन भवन येथे गुरुवारी मान्सुनपूर्व बाबींचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद / नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व इतर यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

मान्सुनपूर्व तयारीचा भाग म्हणून सर्व तहसीलदारांनी तालुका यंत्रणेच्या अधिका-यांसोबत पूरप्रवण भागाचे योग्य नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपल्या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडली तर आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तसेच सर्व यंत्रणेचे दूरध्वनी क्रमांक अपडेड ठेवावे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आपापल्या तालुक्यात असलेल्या साधनसामुग्रीची आताच दुरुस्ती करून घ्यावी. तालुका यंत्रणेने जिल्हा नियंत्रण कक्षासोबत नियमित संपर्क ठेवावा. पूरप्रवण गावात आत्तापासूनच आश्रयस्थाने शोधून ठेवावी व त्याची दुरुस्ती करून सर्व मूलभूत सुविधा राहील याची काळजी घ्यावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी पूर पिडीतांना ठेवण्यात येणा-या आश्रय ठिकाणांची आताच पाहणी करून तेथे पिण्याचे स्वच्छ पाणी, लाईट, पंखे, शौचालय आदी व्यवस्था चांगल्या ठेवाव्यात.

पूर परिस्थितीमध्ये सात रोग पसरणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी. त्यासाठी औषधीसाठा तसेच सर्पदंशाच्या औषधी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध ठेवावा. पुराच्या वेळी किंवा सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर नागरिकांना पर्यटन स्थळ जाण्यासाठी बंदी घालावी. त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावावे. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची, काळजी घ्यावी. पुढील एक महिन्यात सर्व अपदा मित्रांचे प्रशिक्षण घ्यावे.

पूरामुळे किंवा आपत्तीमुळे स्थानिक स्तरावर कोणतेही नुकसान झाले तर कृषी, महसूल व संबंधित विभागाने त्याची त्वरित रिपोर्टिंग जिल्हा मुख्यालय करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करावे. तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावा. तसेच सर्व नगरपालिका /नगरपंचायतींनी अग्निशमन सेवा चोख ठेवावी. तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांची तहसीलदार यांनी बैठक घ्यावी. पूर परिस्थितीमध्ये पुराची दैनंदिन माहिती, धरणाची पातळी, पाणीसाठा व इतर गोष्टी अतिशय काटेकोरपणे जिल्हा मुख्यालय कळवणे आवश्यक आहे. त्यासाठी एक जबाबदार नोडल अधिकारी नियुक्त करावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.