साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची कर्ज योजना
इच्छुकांना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांतग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुबांची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता एन.एस.एफ.डी.सी योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत गरजू व पात्र लाभार्थ्यांना रु. 5 लक्ष ते 50 लक्षपर्यंत विविध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
प्रकल्प रक्कम रु. 5 लक्ष ते 50 लक्षपर्यंतचे कर्ज प्रस्ताव केंद्र शासनाने विकसीत केलेल्या पीएम-सुरज ( PM-SURAJ) या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करावी तसेच तीन प्रतीमध्ये साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावेत.
अपलोड करावयाची व तीन प्रतीत सादर करावयाची कागदपत्रे:
जातीचा दाखला (तहसीलदार यांचेकडून घेतलेला), उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न मर्यादा 3 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो, शिधापत्रिका, आधारकार्ड, यापुर्वी कर्ज/अनुदान न घेतल्यासंबंधी 100 रु. च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, जमीन/दुकानाच्या उपलब्धतेचा पुरावा, (जिथे व्यवसाय करणार आहे त्या जागेचा पुरावा) जागा भाड्याने घेणार असल्याचा भाडेकरार, व्यावसायिक तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभव/प्रशिक्षणाचा पुरावा, व्यावसायाचा प्रकल्प अहवाल, वस्तु आणि साहित्य खरेदी करावयाचे कोटेशन, स्वयंघोषणा पत्र, सिबील प्रमाणपत्र तसेच व्यवसायाच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे आवश्यक राहिल.
अधिक माहितीसाठी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, चंद्रपूर या कार्यालयाशी कार्यानयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.